इराणच्या महिला फुटबॉल संघातील ८ खेळाडू निघाले पुरुष!

शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2015 (07:37 IST)
इराणच्या महिला फुटबॉल संघातील आठ खेळाडू पुरुष असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने क्रीडा जगतात एकच खळबळ माजली असून, यामुळे इराणच्या फुटबॉल नियामक मंडळावर जगभरातून टीकेची झोड उठत आहे. इराण फुटबॉल महासंघाचे हे कृत्य अनैतिक असल्याची प्रखर टीका अनेकांनी केली आहे. विशेष म्हणजे महिला संघात पुरुष खेळाडूंची वर्णी लावण्याची इराणची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीही २0१0 मध्ये इराणच्या संघात चार पुरुष खेळाडू असल्याचे उघड झाले होते. या खेळाडूंना लिंगबदल शस्त्रक्रिया करून महिला व्हायचे असल्याची सारवासारव मंडळाकडून केली जात आहे. मंडळाचे प्रवक्ते मोज्ताबी शरिफी यांनी स्वत: माध्यमांसमोर याची कबुली दिली, हे विशेष. लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर हे खेळाडू महिला होतील. त्यामुळे त्यांना संघात खेळण्यात काहीच अडचण नसल्याचे त्यांचे मत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर इराणच्या क्रीडा अधिकार्‍यांनी सर्व संघाची लिंग चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. जनुकीयरीत्या मजबूत खेळाडूंची संघात वर्णी लावण्यासाठीच इराणच्या फुटबॉल नियामक मंडळाने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. या हीन कृत्यावर जगभरातू छी-थू केली जात आहे.
 

वेबदुनिया वर वाचा