कपील देवनंतर आता महेंद्रसिंह धोनी!

WD
WD
मुंबईच्या रणांगणात फायनलच्या मुकाबल्यात श्रीलंकेस रोखल्यास १९८३ नंतर परत एकदा विश्वकरंडक उंचावण्याचे भाग्य भारतास लाभेल. विश्वकरंडकाच्या पटावर दोन्ही देश आतापर्यंत ७ वेळा लढले आहेत. श्रीलंकेचे पारडे जड राहिले असून त्यांनी ४ वेळा मैदान मारले. भारतास त्यांना फक्त २ वेळा पराभूत करता आले. एक सामना निर्णयाशिवाय संपला.

कपील देवने पहिल्यांदा विश्वकरंडक जिंकला तेव्हा सचिन तेंडुलकर फक्त १० वर्षाचा होता, तर विराट कोहली, आश्विन, मुपाफ पटेल, सुरेश रैना आणि पीयुष चावला यांचा जन्मही झालेला नव्हता. २८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारत क्रिकेट विश्वकरंडक जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. १९८३ विश्वकरंडक विजयाचे किस्से ऐकत मोठी झालेली क्रिकेट पिढी पुन्हा तो क्षण अनुभवण्यास उत्सुक आहे. 'मैदान मारायचेच' या इराद्याने टीम टीम इंडिया झपाटली आहे. आता 'आर-पार'ची लढाई होईल आणि श्रीलंका चीत होईल अशी अपेक्षा करूया.

मात्र विश्वकरंडकाचा इतिहास काहीही सांगो भारतीय संघ श्रीलंकेच्या तुलनेत बलाढ्य आहे हे नक्की. भारताकडे विश्वविख्यात फलंदाज असून सचिन, सेहवागपासून थेट सुरेश रैनापर्यंत मॅचविनर फलंदाजांजी फळी आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वच भारतीय फलंदाज कमालीचे फॉर्म मध्ये असून ते विश्वकरंडक पटकावण्याच्या ईर्ष्येने खेळले तर त्यांना जगातील कोणतीच गोलंदाजी रोखू शकत नाही. सचिनने या
विश्वकरंडकात ८ डावांत ४६४ धावा केल्या असून यामध्ये २ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. विरेंद्र सेहवागने ७ डावातून ३८० धावा केल्या, युवराजने ३४१, गंभीरने २९६ तर विराट कोहलीने २४७ धावा केल्या आहेत. फलंदाजी खूप गहरी असून ३०० धावांचे लक्ष किंवा पाठलाग करणे सहज शक्य आहे आणखी जिंकण्यासाठी काय हवे?

याउलट श्रीलंकन फलंदाजी समतोल नाही. आतापर्यंत त्यांच्या वरच्या फळीने भक्कम दमदार फलंदाजी केल्याने मधली आणि तळातील फळी उघडी पडली नाही. सलामी जोडी दिलशान आणि थरंगाने या विश्वकरंडकात तब्बल दोनदा द्विशतकीय भागिदारी केली आहे आणि कर्णधार कुमार संगकारानेही खोर्‍याने धावा केल्या. दिलशानने ८ डावांतून ४६७, संगकाराने ७ डावांत ४१७ आणि उपुल थरंगाने ८ ३९३ कुटल्या आहे. मात्र या ३ आघाडीच्या फलंदाजांशिवाय इतर फलंदाजांचे या स्पर्धेत योगदान नगण्य आहे. सारांश: श्रीलंकेचे सुरूवातीचे तीन मोहरे टिपले की काम खलास. श्रीलंकन फलंदाजीचे पंख कापायचे झाल्यास भारतास त्यांच्या आघाडीच्या फळीसाठी विशेष योजना बनवून ताबडतोब पॅव्हेलीयनमध्ये पाठवावे लागेल. विश्वकरंडक आणि भारत यांच्यादरम्यान फक्त या तीन बळींचे अंतर आहे म्हटले तरी चालेल.

गोलंदाजी दोन्ही संघाची सारखीच म्हणजे सामान्य आहे. या स्पर्धेत आतापर्यंत श्रीलंकन गोलंदाजीवर लक्ष टाकल्यास त्यांनी फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघास गारद केलेले आहे. मुरली, मेंडीस, हेराथ आणि दिलशान हे चार प्रमुख फिरकी गोलंदाज त्यांनी वापरले आहे. मात्र फिरकी ही भारताची कमजोरी नाही. दोन्ही संघ भारतीय उपखंडातील असल्याने जवळपास सारखे हवामान, खेळपट्ट्या आणि फिरकीचे प्राबल्य हे दुवे समान आहेत. श्रीलंकेकडे वेगवान रिव्हर्स स्विंग करणारा मलिंगा आहे, भारतीय फलंदाजांनी त्यास सांभाळून घेतले म्हणजे झाले.

WD
WD
सेमीफायनल मुकाबल्यात भारतीय गोलंदाजीची धार परिणामकारक जाणवली. झहिरच्या नेतृत्वात सर्वच भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. झहिर खानने या करंडकात ८ सामन्यातून १९ बळी घेतले आहेत. विश्वकरंडक २०११ मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरण्यासाठी त्यास फक्त ३ बळींची गरज आहे. मात्र श्रीलंकेचे दिलशान, संगकारा आणि थरंगा हे त्रिकूट भारतासाठी धोकादायक ठरू शकते. या त्रिकुटाने विश्वकरंडक २०११ मध्ये फायनल खेळण्याअगोदर १२०० हून अधिक धावा केल्या आहेत. आणि ही आकडेवारी कोणत्याही प्रतिस्पर्ध्यास धडकी भरवणारी आहे. यांना रोखण्यासाठी महेंद्रसिंह धोनी आणि त्याच्या सेनेकडे काय डावपेच आहेत, यांवरच फायनलचा निकाल आणि पर्यायाने विश्वकरंडक कुणाचा हे ठरणार आहे. महेंद्रसिंह धोनी १९८३ मधील कपील देवच्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल काय, याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले आहे.


वेबदुनिया वर वाचा