चिंचगावाच्या टेकडीवरील जागृत महादेव मंदिर

सोमवार, 11 ऑगस्ट 2014 (15:22 IST)
माढा तालुक्यातील चिंचगावमधील कुडरूवाडी-बार्शी रस्तलगतच्या टेकडीवरील महादेव मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. टेकडीवरील घनदाट झाडीमध्ये हे मंदिर असल्याने वातावरणही आल्हाददाक आहे. या ठिकाणी पूर्वी छोटे मंदिर होते. सध्या या मंदिरात वास्तव्यास असलेल्या परमपूज्य स्वामी रामानंद सरस्वती यांनी लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. या मंदिरावर आकर्षक कलाकुसर करण्यात आली आहे. या मंदिरात तळमजल्यावर धनमंदिर असून या ठिकाणी भक्तांना एकांतामध्ये ध्यानधारणा करता यावी, या उद्देशाने धनमंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. रम्य परिसरामुळे येथे सकाळ-सायंकाळ ध्यानासाठी येणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे.
 
ध्यानमंदिरावरील मजल्यावर मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात श्रीगणेश, विठ्ठल-रुक्मिणी, श्रीदत्त आदी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तसेच येथे एक सुंदर शिवलिंगही आहे. गाभार्‍यासमोर नंदी आहे.
 
भव्यदिव्य आकाराच्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर द्वारशिल्पे आहेत. मंदिरातील दगडी खांब, भिंती व छतावर विविध देवतांची शिल्पे साकारण्यात आली आहेत. मंदिराचे शिखर नाजूक कलाकुसरीने नटलेले असल्याने हे मंदिर निश्चितच बघण्यासारखे आहे. येथे श्रवणी सोमवारी मोठी यात्रा भरते. तसेच या मंदिरात परमपूज्य स्वामी रामानंद सरस्वती महाराजांच्या मार्गदर्शनाने दर पौर्णिमा, महाशिवरात्री दिवशी हरिपाठ, प्रवचन, कीर्तन नंतर महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे कालबध्द आयोजन केले जाते. यानिमित्त या ठिकाणी येणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय असते.

मुकेश परबत  

वेबदुनिया वर वाचा