'सबका मालिक एक' अशी जगाला समानतेची शिकवण देणारे सगळ्यांचे परिचीत साईबाबांनी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या छोट्याशा गावाला जागतिक किर्ती मिळवून दिली आहे. ईश्वर हा सर्वव्यापी असून तो चराचरात सामावला आहे, असे साईबाबा सांगून गेले आहेत.
साईबाबांचे हे मंदिर गावाच्या मध्यभागी वसले आहे. याशिवाय साईबाबाच्या वास्तव्याने पावन झालेल्या खंडोबा मंदिर, द्वारकामाई, चावडी अशा ठिकाणांना रोज हजारो भक्त भेट देतात. समाधीमंदिर हे मुख्य ठिकाण. याठिकाणी पुर्वी वाडा होता. साईबाबांचे वास्तव्य अखेरच्या काही दिवसात इथे होते. इथे साईबाबांची समाधी आहे. या मंदिरात शांत निवांतपणे बसलेल्या स्थितीतली पांढर्या शुभ्र संगमरवराची साईबाबांची मूर्ती आहे. समाधी मंदिराचे नित्य उपक्रम सकाळी पाच वाजता सुरू होतात. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात घुमणारे भुपाळी स्वरांनी भक्त मंदिराकडे साईबाबांच्या ओढीने खेचला जातो. शिर्डी आणि साईबाबा हे आता समानार्थी शब्द झाले आहेत.
याशिवाय भक्त दर्शन घेतात ते खंडोबा मंदिराचे. हे तेच मंदिर आहे ज्याठिकाणी साईबाबांनी शिर्डीत सर्वप्रथम दर्शन दिले होते. असे सांगतात की या मंदिराचे विश्वस्य आसलेल्या म्हाळसापती सोनारांनी कफनी घातलेल्या दाढी वाढलेल्या साईबाबांना पाहताक्षणी 'या! साई' अशी हाक मारली आणि तेव्हापासून ते साईबाबा याच नावाने भक्तांना परिचित झाले. इथे एक मोठे वडाचे झाड आहे. आता इथे एक छोटे मंदिर उभारण्यात आले आहे. त्यात साईबाबांच्या पादुका ठेवल्या आहेत.
त्यानंतर गुरुस्थानाचे दर्शन भक्त मोठ्या श्रध्देने घेतात. साईबाबांच्या सांगण्याप्रमाणे याठिकाणी कडुलिंबाच्या झाडाखाली त्यांच्या गुरुची समाधी आहे. इथे अजूनही ते कडुनिंबाचे झाड बहरले आहे. इथे एक शिवलिंग आहे आणि साईबाबांची मूर्ती आहे. या मूर्तीसमोर दर मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी धुनी पेटवण्यात येते. गुरुस्थान हे आत्मीक शांती देणारे ठिकाण आहे.
द्वारकामाई! हे आणखी एक महत्त्वाचे ठिकाण. साईबाबा जिथे राहायचे त्या ठिकाणाला ते द्वारकामाई म्हणून संबोधायचे. असं सांगतात की, साईबाबा लग्नाच्या वर्हाडासोबत शिर्डीला आले आणि उतरले ते याच ठिकाणी आणि अखेरपर्यंत ते इथेच राहिले. इथल्या धुनीची उदी भक्तांना द्यायचे. द्वारकामाईला लागून एक संग्रहालय साई संस्थानाने विकसित केले आहे. याठिकाणी साईबाबांच्या रोजच्या वापरातले पाण्याचे भांडे, कांबळे, जाते इ.वस्तू ठेवल्या आहेत. शिवाय ज्या दगडावर बसून साईबाबा भक्तांचे दु:ख निवारत ती मोठी शिला ही इथे ठेवली आहे. साईबाबांचे एक मोठे पोट्रेट याठिकाणी आहे.
ज्या ठिकाणी साईबाबा झोपायचे त्याठिकाणाला ते चावडी म्हणायचे. ही चावडी द्वारकामाईला लागूनच आहे. इथेही साईबाबांचे एक मोठे पोट्रेट लावले आहे. समाधी मंदिर आणि इतर संबंधित ठिकाणांचे दर्शन एक आत्मशांतीचा अनुभवन देणारे आहे.