युक्रेनचा दावा: रशियात घुसून पूल केला नष्ट, नेमकं काय घडलं?
मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (17:46 IST)
युक्रेनने रशियाच्या कुर्स्क भागातील एक महत्त्वाचा पूल उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कुर्स्क भागात घुसून युक्रेननी ही कारवाई केल्याचा दावा करण्यात आला आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच परदेशी सैनिक रशियन भूमीवर दाखल झाले आहेत. जवळपास दोन आठवड्यांपासून युक्रेनचे सैन्य रशियाच्या कुर्स्कमध्ये तळ ठोकून आहेत.
युक्रेनच्या लष्कराने रविवारी पुलावरील हल्ल्याचा व्हीडीओही जारी केला आहे. ज्वानोएमधील सेयम नदीवर हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
युक्रेनियन सैन्याने कुर्स्कच्या भागात केलेला प्रवेश रशियासाठी एक धक्का होता. युक्रेन या भागात जवळपास दोन आठवड्यांपासून आपली स्थिती मजबूत करत आहेत.
तर, तेव्हापासून रशियाने आपल्या हजारो नागरिकांना या भागातून बाहेर काढले आहे.
रशियासाठी किती मोठा धोका?
युक्रेनी हवाई दलाचे कमांडर लेफ्टनंट जनरल मायकोला ओलेशुक यांनी हल्ल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध करत “आणखी एक पूल उद्ध्वस्त केला,” असं सोशल मीडियावर म्हटलं आहे.
जनरल ओलेशुक यांच्यानुसार "युक्रेनी हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्याने शत्रुंच्या सैन्याची क्षमता कमी झाली आणि याचा युद्धावर व्यापक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले."
युक्रेनी सेनेने प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओत पुलावर धुराचा मोठा लोट दिसत असून पुलाचा एक भाग नष्ट झाल्याचे दिसत आहे. मात्र, हा हल्ला नक्की केव्हा करण्यात आला याबाबत स्पष्टता नाही.
हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले की, 'सैन्याचा कुर्स्कमध्ये घुसखोरी करण्यामागचा उद्देश रशियन हल्ल्यांना रोखण्यासाठी बफर झोन तयार करणे हा होता.'
2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये सातत्याने युद्ध सुरू आहे. युक्रेनने जवळपास दोन आठवडे रशियन भागात मोठे हल्ले सुरू ठेवले आहेत.
या आठवड्याच्या सुरुवातीला, युक्रेनने ग्लुश्कोवो शहराजवळील सेयम नदीवरील आणखी एक पूल नष्ट केला.
रशिया त्या पुलाचा वापर आपल्या सैन्याला आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी करत असे.
युक्रेनियन लष्करी विश्लेषकांनी आधी या भागातील असे तीन पूल शोधून ठेवले होते, जिथून रशिया आपल्या सैन्याला आवश्यक वस्तूंचा पुरवठा करायचा.
त्यापैकी दोन पूल एकतर नष्ट झाले असावेत किंवा त्यांचं गंभीर नुकसान झालं असावं, असं रॉयटर्सने म्हटलं होतं.
यामागचा उद्देश काय?
युक्रेनियन सैन्याने रशियन सीमेच्या आत कुर्स्क प्रदेशात घुसखोरी केल्याच्या जवळपास दोन आठवड्यांनंतर, हे स्पष्ट होत आहे की त्यांचा या ठिकाणीच तळ ठोकून राहण्याचा विचार आहे.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शनिवारी (17 ऑगस्ट) म्हणाले की आपले सैनिक कुर्स्कमध्ये असून आपली ते पुढे कूच करत आहेत.
रविवारी (18 ऑगस्ट) संध्याकाळी आपल्या भाषणात ते म्हणाले, "आपल्या सैन्याकडून रशियन सैन्याचे, त्यांच्या संरक्षण उद्योगांचे आणि अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान करण्यात येत आहे."
झेलेन्स्की म्हणाले की ही मोहीम आमच्यासाठी फक्त आता आपले संरक्षण करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. रशियाला जास्तीत जास्त नुकसान पोहोचवून त्यांना युद्धात निष्प्रभ करणे हे आमचे ध्येय होते.
झेलेन्स्की म्हणाले आहे की, हल्लेखोरांच्याच क्षेत्रात एक वॉर बफर झोन तयार करुन आपला देश सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली आहे.
राष्ट्रपती झेलेन्स्की यांचे सल्लागार मिखाइलो पोडोल्यक यांनी म्हटले की 'रशियावर ताबा मिळवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.'
केवळ रशियाने वाटाघाटीसाठी तयार व्हावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रशियाने या मोहिमेची दखल घेतली असून या कारवाईविरोधात 'योग्यवेळी प्रत्युत्तर' दिले जाईल असे म्हटले आहे.
ज्याप्रकारे युक्रेन पश्चिम रशियाच्या दिशेने पुढे सरकतोय, त्याचप्रमाणे रशियाचं सैन्यही युक्रेनच्या पूर्व भागात पुढे सरकत आहेत.
सद्यस्थितीत रशियन सैन्याने युक्रेनची अनेक गावेही आपल्या ताब्यात घेतली आहेत.
आण्विक प्रकल्पाला धोका
दरम्यान दुसऱ्या एका स्वतंत्र घटनेत हल्ला झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांशी संलग्नित असलेल्या इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी एजन्सीने (IAEA) चिंता व्यक्त केली आहे.
IAEA प्रमुखांनी इशारा दिला आहे की, रशियन-व्याप्त युक्रेनमधील झापोरिझिया पॉवर प्लांटमधील आण्विक सुरक्षेची परिस्थिती बिकट होत चालली आहे.
दुसऱ्या एका स्वतंत्र घटनेत या प्रकल्पाच्या भिंतीजवळ ड्रोनने शनिवारी हल्ला झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
IAEAचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
या आण्विक प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी त्यांनी सर्व दोन्ही बाजूच्या देशांना जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
IAEA ने सांगितलं की हल्ल्याचा परिणाम प्लांटच्या बाहेरील रस्त्यावर झाला. आण्विक प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या स्रोताजवळच अगदी 100 मीटर अंतरावर हाय व्होल्टेज लाइन आहे त्या जवळच हा हल्ला झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रशिया-युक्रेन युद्धाच्या सुरुवातीस रशियन सैन्याने या प्रकल्पावर ताबा मिळवला होता. या प्रकल्पावर अनेक वेळा हल्ले करण्यात आले होते पण त्यासाठी रशिया आणि युक्रेन यांनी एकमेकांवरच आरोप-प्रत्यारोप केले होते.
गेल्या आठवड्यातही या प्लांटच्या कुलिंग टॉवरला लागलेल्या आगीनंतर युक्रेन आणि रशियाने एकमेकांवर आरोप केले होते.
मात्र, शनिवारचा हल्ला कोणी केला हे IAEA ने सांगितलं नाही. पण झापोरिझियामध्ये तैनात असलेल्या टीमने, स्फोटके वाहून नेणाऱ्या ड्रोनमुळे हे घडल्याचे दिसत असल्याचे म्हटले.
“प्लांटपासून काही अंतरावर सतत स्फोट, हेवी मशीन गन, रायफल आणि तोफांचे आवाज ऐकू आले”, असे एजन्सीने निवेदनात म्हटले आहे.
या प्लांटमध्ये दोन वर्षांहून अधिक काळपासून वीजनिर्मिती झालेली नाही आणि एप्रिल महिन्यापासून येथील सर्व 6 अणुभट्ट्यादेखील बंद आहेत.
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने पहिल्यांदा युक्रेनवर हल्ला चढवला होता. पूर्व युक्रेनमधील बऱ्याच मोठ्या भागावर ताबा मिळवल्यानंतर रशियाचे सैन्य सौम्य गतीने आगेकूच करत आहे.
असं असलं तरी युक्रेनने रशियाच्या कुर्स्क भागात घुसखोरी केली आणि हा भाग जवळपास 2 आठवड्याहून अधिक काळासाठी आपल्या ताब्यात ठेऊन रशियाला धक्का दिला.
या कारवाईनंतर हजारो रशियन नागरिकांनी या भागातून स्थलांतर केले आहे.
द्वितीय महायुद्धानंतर पहिल्यांदाच परराष्ट्राच्या सैन्याने रशियाच्या भूमीवर पाय ठेवला आहे.