रशिया युक्रेन युद्ध : भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, जाणून घ्या 5 महत्त्वाचे अपडेट्स
मंगळवार, 1 मार्च 2022 (18:34 IST)
रशिया युक्रेन युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. खारकीव्हवरच्या हल्ल्यात एक भारतीय विद्यार्थी ठार झाला आहे. खारकीव्ह शहरावर रशियाने क्षेपणास्र हल्ला केला. या शहरावर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये एक भारतीय विद्यार्थी मारला गेल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीट करत दिली आहे.
खारकीव्ह हे युक्रेनमधलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे. युक्रेनमधले महत्त्वाचे उद्योग या शहरात आहेत. यामध्ये रणगाड्याची फॅक्टरी आणि आय.टी. उद्योगांचाही समावेश आहे.
1. कीव्ह तातडीने सोडा, भारतीय दूताावासाचे आदेश
युक्रेनची राजधानी कीव्ह शहरातील भारतीय विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांनी तातडीने शहर सोडावं असा आदेश युक्रेनमधील भारतीय दूतावासाने दिला आहे.
येत्या काही दिवसांत राजधानी कीव्हचा ताबा मिळविण्यासाठीचा संघर्ष तीव्र होऊ शकतो. हे लक्षात घेऊन भारतीय दूतावासाने भारतीयांना हा सल्ला पाळण्याचं आवाहन केलं आहे. काही मिनिटांपूर्वीच दूतावासाने यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
रशियाच्या फौजा सातत्याने कीव्ह शहरावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. येत्या काही दिवसात राजधानी कीव्हचा ताबा मिळवण्यासाठीचा संघर्ष तीव्र होऊ शकतो. हे लक्षात घेऊन भारतीय दूतावासाने भारतीयांना या सल्ल्याचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
ट्रेनने किंवा अन्य कोणत्याही उपलब्ध वाहतूक प्रणालीद्वारे कीव्ह शहरातून बाहेर पडा असं भारतीय दूतावासाने म्हटलं आहे. युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी पोलंड, हंगेरी, रोमानिया या देशांमध्ये खुश्कीच्या मार्गाने जाऊन तिथून मायदेशी परतत आहेत. यासाठी ऑपरेशन गंगा कार्यान्वित करण्यात आलं आहे.
2. भारताचं ऑपरेशन गंगा
कमीतकमी कालावधीत जास्तीत जास्त भारतीयांची युक्रेनमधून सुटका करण्यासाठी 'ऑपरेशन गंगा' ही मोहीम राबवण्यात येणार आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठीच्या प्रयत्नांमध्ये हवाई दलालाही समाविष्ट करून घेण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
वायूदलाची C17 विमानं युक्रेनला रवाना होणार आहेत.
दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी स्लोव्हाकियाच्या कोसाइसमधून भारतासाठी स्पाइसजेट कंपनीचं विमान रवाना होणार आहे. केंद्रीय मंत्री किरण रीजीजू विशेष दूत म्हणून रवाना झाले आहेत.
3. रशियाने केले हल्ले तीव्र
युक्रेनच्या क्षेत्रफळापैकी 75 टक्के भागावर रशियाचं सैन्य पोहोचलं आहे. कीव्ह तसंच खारकीव्ह शहरावर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियाकडून जोरदार हवाई हल्ले सुरू आहेत.
युक्रेनमधलं दुसरं मोठ्या क्रमाकांचं शहर खारकीव्हमध्ये रशियाने जोरदार हल्ले केले. फ्रीडम स्क्वेअर परिसरातील सरकारी इमारती रशियाच्या हल्ल्याचं लक्ष्य होतं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओंमध्ये क्षेपणास्त्र सरकारी इमारतीवर आदळताना दिसत आहे. जोरदार धमाक्यामुळे धुराचे लोळ परिसराला वेढून टाकतात.
इमारतीचं प्रचंड नुकसान झालं आहे आणि गाड्या उडून विखुरल्या गेल्या आहेत. या हल्ल्यात अद्यापतरी जीवितहानीचं वृत्त नाही. हल्ल्यानंतरच्या परिस्थितीच्या व्हीडिओची शहानिशा बीबीसीने केली.
ओखत्यार्का शहरातील लष्करी तळावर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात युक्रेनच्या 70 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
खारकीव्ह शहरातील फ्रीडम स्क्वेअर भागामध्ये झालेल्या स्फोटाचा व्हीडिओ युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्वीट केला आहे. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर 'वॉर क्राइम'चा आरोप केला आहे. जगाने रशियावर बहिष्कार टाकावा अशी मागणी ते करत आहेत.
4. रशियन फौजांचा प्रचंड ताफा युक्रेनच्या दिशेने
रशियाच्या फौजांचा प्रचंड ताफा युक्रेनची राजधानी कीव्हच्या दिशेने चाल करत आहे. 40 मैल लांब इतका या फौजेचा आवाका आहे. सॅटलाईट फोटोंच्या माध्यमातून हे स्पष्ट झालं आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आजचा सहावा दिवस आहे आणि युक्रेनियन फौजा त्यांच्या आणि त्यांना इतर देशांनी दिलेल्या शस्त्रास्रांच्या मदतीने लढत आहेत. सामान्य नागरिकांच्या हातातही बंदुका देण्यात आलेल्या आहेत.
5. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रशियावर बंदी
युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याप्रकरणी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून रशियाला बाहेर काढण्यात आलं आहे. क्लब विश्वचषक स्पर्धेतूनही रशियाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
फिफा आणि युएफाने हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला रशियाला पात्रता फेरीचे सामने खेळू देण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं मात्र हा निर्णय बदलत त्यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
रशियाला खेळण्याची परवानगी देण्याच्या निर्णयावर पोलंडने आक्षेप घेतला होता. रशियाविरुद्धच्या सामन्यावर ते बहिष्कार घालतील असं त्यांनी सांगितलं.