रशियाचं युक्रेनवर 'आक्रमण', राजधानी कीव्हमध्ये स्फोटांचे आवाज
गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (10:16 IST)
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या दॉनबस भागामध्ये लष्करी कारवाई सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी टीव्हीवर एका भाषणात ही घोषणा केली आहे. दरम्यान युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त आहे.
दोनेत्स्क भागात स्फोट
दरम्यान, पुतीन यांनी लष्करी कारवाईची घोषणा करताच युक्रेनच्या काही भागांमध्ये स्फोट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
बीबीसीच्या पूर्व युरोपच्या प्रतिनिधी सारा रेन्सफोर्ड या सध्या दोनेत्स्क भागात आहेत. काही क्षणापूर्वीच त्यांनी याठिकाणी एका मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकल्याची माहिती दिली आहे.
युक्रेनच्या दॉनबस प्रांतात लष्करी कारवाईची रशियाची घोषणा
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पुतीन यांना रोखण्यासाठी विनंती केली जात असतानाच, त्यांनी मात्र अशा प्रकारे लष्करी कारवाई सुरू करत असल्याचं जाहीर केलं आहे.
पुतीन यांच्या घोषणेनंतर आता दॉनबसच्या भागामध्ये रशिया आणि युक्रेनच्या लष्करामध्ये थेट संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी सकाळी टीव्हीवरून केलेल्या भाषणामध्ये पुतीन यांनी युक्रेनच्या सैनिकांनी शस्त्र खाली टाकून पूर्व युक्रेनच्या प्रांतातून आपापल्या घरी परतण्याची विनंती केली.
या ठिकाणी होणाऱ्या रक्तपातासाठी युक्रेनच जबाबदार असेल, असा इशाराही पुतीन यांनी त्यांच्या भाषणात दिला आहे.
मात्र, रशियाच्या आक्रमणाला आम्ही पाठ दाखवणार नाही. आम्ही आमचं संरक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज असल्याचंही झेलेन्सकी यांनी म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं याबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं आहे. रात्री उशिरा न्यूयॉर्कमध्ये ही बैठक होणार आहे. युक्रेननं तातडीनं ही बैठक घेण्याची मागणी केली होती.
दरम्यान, युक्रेनमधीन दोनेत्स्क आणि लुहान्स्क या बंडखोर प्रदेशांनी रशियाकडे संरक्षणाची मागणी केल्यानंतर, रशियाला मोठ्या प्रमाणात सैन्य घुसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन भागांकडून रशियाला मदतीसाठी पत्र मिळाल्यानं रशियातील माध्यमांमध्ये म्हटलं आहे.
तर या संपूर्ण संकटाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये 30 दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियानं जवळपास 2 लाख सैन्य तैनात केल्याचंही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे.