अर्थव्यवस्थेसाठी २००७ फील गुड वर्ष

वेबदुनिया

शनिवार, 22 डिसेंबर 2007 (17:14 IST)
2007 हे वर्ष उद्योग जगतासाठी खूपच चांगले गेले. शेअर बाजाराने विक्रमी उंची गाठली. चलनवाढही ती टक्क्यांपर्यंत खाली घसरून महागाईला आळा घातला गेला. टाटाने कोरसला तर मित्तल यांनी आर्सेलर कंपनीला खिशात टाकून उद्योग जगतात भारतीय ऐरावताची दादागिरी दाखवून दिली. त्याचवेळी जगभरात पसरलेल्या भारतीय व्यवस्थापकांनी अनेक महत्त्वाच्या कंपन्यांची उच्च पदे मिळवून भारतीय बुद्धिमत्तेची छाप उमटवली. त्यामुळे बॅंकींगपासून ऑटोमोबाईलपर्यंत सर्व क्षेत्रात खऱ्या अर्थाने फील गुड वाटले.

डॉलरची किंमत वाढल्याने निर्यातदारांपुढे मोठी अडचण उभी राहिली. त्याचवेळी अनिल अंबानी यांना भावाबरोबरच वाद आणि देशातील अनेक ठिकाणी त्यांच्या रिलायन्स फ्रेशला झालेला विरोध डोकेदुखीला कारण ठरला. सेझच्या मुद्दयावरून केंद्र सरकार आणि ठिकठिकाणची राज्य सरकारे अनेकदा अडचणीत आली. पण या काही बाबी सोडल्या तर एकूणातच हे वर्ष चांगले गेले.

शेअर बाजार नव्या उंचीव
भारतीय शेअर बाजारासाठी हे वर्ष 'वाढता वाढता भेदीला वीस हजार निर्देशांकाला' असे गेले. बाजाराचा बैल यावर्षी वेगाने पुढे पुढे पळत होता. त्यामुळेच ३१ डिसेंबर २००६ ला निर्देशांक १३ हजार ७८७ वर होता. या वर्षांत तो वीस हजाराच्या वर जाऊन आला. याचा अर्थ एका वर्षात सहा हजार निर्देशांकाचा प्रवास त्याने केला. म्हणूनच गुंतवणूकदार यावर्षी खुश होते. परदेशी गुंतवणूकदार संस्थाही खुश आहेत. पण बाजाराचे संवेदनशील रूपही दिसून आले. बाजार एके दिवशी पंधराशे अंकांनी कोसळला, पण एका दिवशी तेराशे अंकाची वाढही त्यात झाली.

परदेशी कंपन्यांचे अधिग्रह
भारतीय उद्योगांसाठी हे वर्ष चांगले गेले. टाटा स्टील, किंगफिशर, ओएनजीसी या कंपन्यांसाठी ते विशेष आठवणीत राहील. भारतीय वंशाचे उद्योजक लक्ष्मी मित्तल यांच्या मित्तल स्टीलने आर्सेलर या जगातील बड्या स्टील कंपनीला विकत घेऊन भारतीय ताकद दाखवून दिली. त्यालाच पुढे नेताना भारतातील अनेक उद्योगांनी रिटेल, रियल इस्टेट व ऑटोमोबाईल क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची ध्वजा फडकावली. टाटाने कोरसचा घास घेऊन सगळ्यांना चकीत केले. आता जग्वार व प्युजोची निर्मिती करणाऱ्या फोर्डच्या कंपनीला गिळंकृत करण्याची तयारी सुरू आहे.

भारतीय बुद्धिमत्तेची छाप जगताव
अनेक भारतीयांनी जागतिक कंपन्यांवर आपला ठसा उमटवला. नागपूरचे विक्रम पंडित यांना सीटी ग्रुपचे सीईओपद मिळाले. त पद्मश्री वारियर यांना सिस्कोचे सीटीओपद मिळाले. याशिवाय पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नुयी, व्होडाफोनचे सीईओ अरूण सरीन, हार्टफोर्ड इंटरनॅशनलचे रामाणी अय्यर व एडोब सिस्टिम्सचे शांतनू नारायणन यांचीही जगावर छाप पडली. भारतीय वंशाचे सी. के. प्रल्हाद जगातील सर्वांत प्रभावी थिंकर म्हणून निवडले गेले.

  डॉलरची किंमत वाढल्याने निर्यातदारांपुढे मोठी अडचण उभी राहिली. त्याचवेळी अनिल अंबानी यांना भावाबरोबरच वाद आणि देशातील अनेक ठिकाणी त्यांच्या रिलायन्स फ्रेशला झालेला विरोध डोकेदुखीला कारण ठरला.      
रूपया मजबू
अमेरिकेचे राजकीय महत्त्व कमी होत असताना त्यांना आर्थिक बाबतीतही नुकसान झाले. डॉलरची किंमत घसरल्याने अमेरिकेचे धाबे दणाणले आहे. आखातात अमेरिकेने केलेला उतपातही मुळावर आला आहे. डॉलरची किंमत घटल्याने रूपयाची किंमत वधारली. रूपयाची किंमत वाढल्याने निर्यातदारांना मोठा फटका बसला, पण आयातदारांची मात्र चांदी झाली.

गुंतवणूकदारांसाठी पायघड्य
गेल्या वर्षाच्या तुलनेत भारताने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी चांगली योजना तयार केली. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. परदेशी कंपन्या भारतात येण्यास उत्सूक दिसल्या. बॅंकिंग, रिटेल, टेलिकॉम, आयटी, बीपीओ, केपीओ या क्षेत्रात त्यांची रूची जास्त दिसली. शेअर बाजारातील तेजीचे श्रेय त्यांनाही जाते.

मोटारसायकलला कराची धड
सरकारने दुचाकी वाहनांवर कर लावल्याने विक्रीत ३.८९ टक्के घट झाली. कर्ज कमी उपलब्ध झाल्याने मोटारसायकल उद्योगाला फटका बसला. २००७ मध्ये केवळ ७५ लाक दुचाकींची विक्री झाली. त्यामुळे आगामी वर्षाकडून या उद्योगाला मोठ्या अपेक्षा आहे. वर्षाच्या शेवटी सरकारनेही त्यांना तसे आश्वासन दिले आहे. त्याचवेळी कार उद्योगासाठी मात्र हे वर्ष आनंदात गेले. टाटा व मारूतीने कोट्यावधी रूपये गुंतविण्याची योजना तयार केली. या उद्योगाने वर्षभरात दहा लाख कार विकून विक्रम केला.

रिटेल उद्योगाचा बोलबाल
रिटेल कंपन्यांचा याही वर्षी बोलबाला होता. वॉलमार्टसहीत जगभरातील बड्या कंपन्या भारतावर नजर ठेवून होत्या. रिलायन्स, सुभिक्षा, बिग बाजार यांनी लोकांना मॉलमध्ये खरेदीची सवय लावली. रिलायन्सने भाजीविक्रीत उतरून विक्रेत्यांचे शिव्याशाप खाल्ले. २००६ मध्ये देशात केवळ १०५ मॉल होते. २००७मध्ये त्यांची संख्या १८० झाली. जागतिक अर्थव्यवस्थेत दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत पाचवे रिटेल डेस्टिनेशन असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे आगामी वर्षातही या उद्योगात तेजी दिसेल.

सेझला कडाडून विरो
हे वर्ष सेझला कडाडून झालेल्या विरोधासाठीही ओळखले जाईल. शेतकऱ्यांकडून जमिनी अधिग्रहित करण्यात सरकारला डोकेदुखी झाली. सरकारी धोरणांवर टीका करण्यात आली. पण सरकारही भूमिकेवर ठाम होते. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओरीसा या राज्यात सेझवरून रणकंदन झाले. मध्य प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्र सरकारने उद्योगांना आकर्षित करण्यासाठी बरेच प्रयत्न केले.

पंचवार्षिक योजना
या वर्षाच्या शेवटी पंतप्रधानांनी उद्योग जगताला अकराव्या पंचवार्षिक योजनेची भेट दिली. या काळात आर्थिक वाढीचा दर दहा टक्के राहील, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

एकूणात काय तर २००७ हे वर्ष उद्योग जगताच्या दृष्टिकोनातून बरेच काही मिळवून देणारे ठरले. याच्या जोरावर २००८ मध्ये भारत पुढचा मोठा टप्पा गाठेल ही अपेक्षा.

वेबदुनिया वर वाचा