प्रजासत्ताक दिन: महात्मा गांधींच्या आवडीच्या गाण्याचा वाद काय आहे?

सोमवार, 24 जानेवारी 2022 (22:19 IST)
मयुरेश कोण्णूर
या वर्षी आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय आणि या अमृतमहोत्सवी वर्षातला प्रजासत्ताक दिन झाल्यावर 1950 सालापासून परंपरा असणारी सांगीतिक धून समारोपाच्या 'बीटिंग द रिट्रीट' या समारोहात वाजणार नाहीये.
 
ही धून आहे 'अबाईड विथ मी' या मूळ अध्यात्मिक इंग्रजी गाण्याची. पण या वर्षी असं काय झालं की 72 वर्षं न चुकता वाजणारी ही धून आता सैन्यदलाच्या गाण्यांच्या यादीतून बाहेर केली गेलीये? आणि या सगळ्या प्रकरणांत महात्मा गांधींचा काय संबंध? तेवढंच नाही तर यावरुन एक राष्ट्रीय स्तरावरचा वाद सध्या का सुरू झालाय आणि त्याला राजकीय फोडणी का मिळाली आहे?
 
1. गांधींजींचे आवडते गाणे
 
प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण सोहळा फक्त एका दिवसाचा नसून काही दिवसांचा असतो आणि त्याच्या समारोपाला 'बीटिंग द रिट्रीट' हा सोहळा पार पडतो. पण या सोहळ्याची सांगता होताना, अगदी शेवटी सैन्यदलाचं संगीतपथक 1950 पासून 'अबाईड विथ मी'या इंग्रजी अध्यात्मिक, स्तुतीपर गाण्याची धून वाजवतं असतं.
 
ती झाल्यावर मग 'सारे जहां से अच्छा' हे गीत वाजवत सैन्यदलाच्या या समारोहात सहभागी झालेल्या तुकड्या आपापल्या बराकींमध्ये परततात. 'अबाईड विथ मी' हे महात्मा गांधींचं आवडतं गाणं आणि धून असल्यानं या समारोहात त्याचा समावेश करण्यात होता.
 
2. ए- मेरे वतन के..वाजणार
 
दरवर्षी अबाईड विथ मी वाजायचं. पण या वर्षी जेव्हा सैन्यातर्फे वाजवल्या जाणाऱ्या गीतांची यादी जाहीर केली गेली, त्यात 'अबाईड विथ मी' नव्हतं.
 
त्याजागी कवि प्रदीप यांनी लिहिलेलं आणि लता मंगेशकरांनी भारत -चीन युद्धावेळेस गायलेलं 'ए मेरे वतन के लोगो' हे देशभक्तीपर गीत आता वाजवलं जाणार आहे.
 
3. काँग्रेसची टीका
 
गांधींजींशी संबंधित परंपरा, सहिष्णुतेचा संदेश या सरकारला पुसून टाकायचा आहे, असा आरोप काँग्रेसनं केला. तर भारताशी आणि इथल्या संस्कृतीशी नातं सांगणारी गीतं या समारोहात समाविष्ट असावीत असा दृष्टिकोन असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात येतं आहे.
 
4. 'अबाइड विथ मी केवळ ख्रिश्चनांपुरतेच मर्यादित नाही'
 
"अबाइड विथ मी' हे 1847 सालचं ख्रिश्चन भजन आहे, पण आता ते केवळ ख्रिश्चन धर्मापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते आता सगळ्या धर्मांशी संबंधित असलेलं सार्वभौम भजन आहे. 1950 पासून ते 'बीटिंग द रिट्रीट' समारोहाचा हिस्सा होतं.
 
"पण मला आणि असंख्य नागरिकांना याचं दु:ख होत आहे की प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्षी या भजनाला आपण सोडचिठ्ठी दिली. भाजपा सरकार असहिष्णुतेच्या या टप्पावर पोहोचलं आहे की त्यांच्या या अपमानजनक कृत्यांचा निषेध करण्यासाठीही शब्द उरले नाहीत," असं माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विटरवर लिहिलं
 
5. तुषार गांधींनी व्यक्त केली नाराजी
 
लेखक आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनीही 'अबाईड विथ मी' च्या हटवण्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
 
6. 'सर्वांना समजतील अशा धून'
 
सरकारनं मात्र अशा कोणत्याही प्रकारचा गैरहेतू या निर्णयामागे नसल्याचं म्हटलं आहे. भारताशी आणि इथं मूळ असणारी संगीतधून वाजवल्या जाव्यात जेणेकरुन त्यासगळ्यांना समजतील हाच हेतू आहे, असं सरकारचं म्हणणं आहे.
 
7. या गाण्याचा इतिहास काय आहे
 
या गीताची किंवा भजनासारख्या स्तुतीचा इतिहास 1820 इथपर्यंत मागे जातो. हेनरी फ्रान्सिस लायटी या स्कॉटिश एंग्लिकन चर्चच्या अधिकाऱ्यानं लिहिलेलं हे गीत आहे.
 
1847 मध्ये त्याच्या मृत्यूनंतरच वास्तविक ते म्हटलं गेलं, पण नंतर विल्यम हेनरी मॉन्क या इंग्लिश संगीतकारानं तयार केलेल्या एका धुनवर आजही सर्वत्र ते म्हटलं जातं. ते खूप प्रसिद्धही आहे.
 
जगभरात अनेक चर्चमध्ये ते म्हटलं जातं, तर इंग्लंडची राणी क्विन एलिझाबेथ (दुसऱ्या) यांच्या विवाहसोहळ्यातही ते वाजवलं गेलं. असं म्हणतात, टायटॅनिक बोट बुडत असताना त्यावर जो संगीतचमू होता, तेही हेच गाणं वाजवत होते.
 
8. 'साधेपणामुळे भावले गांधींजींना'
 
हे गीत आणि त्याचं संगीत त्यातल्या साधेपणासाठी, खोलवर भावणाऱ्या परिणामासाठी प्रसिद्ध आहे. त्यासाठीच ते महात्मा गांधींनाही भावलं आणि त्यांचं आवडतं बनलं. त्यांनी ते म्हैसूर राज्याचा जो बँड होता, ते वाजवतांना पहिल्यांदा ऐकलं आणि गांधी त्याचा परिणाम विसरू शकले नाहीत.
 
त्यांना त्या संगीतात दोन धर्मांमधला परस्पर सहिष्णुतेचा धागा दिसला. त्यांच्या साबरमतीच्या आश्रमातली जी भजनावली होती, त्यात 'रघुपती राघव राजाराम' सोबत 'अबाईड विथ मी' हे गीतही गांधींनी अंतर्भूत केलं.
 
9. महत्त्वाची परंपरा
 
ज्या सोहळ्यात हे गीत वाजवले जायचे आणि तिथं आता ते वाजवलं जाणार नसल्यानं वाद सुरू झाला आहे, तो 'बीटिंग द रिट्रीट' हा सोहळाही भारतीय स्वातंत्र्यकाळातली एक महत्वाची परंपरा आहे.
 
1950 साली भारत प्रजासत्ताक राष्ट्र झाल्यापासून हा सोहळा होतो. जरी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन असला तरीही हा सोहळा आठवडाभर चालतो आणि 29 जानेवारीच्या संध्याकाळी 'बीटिंग द रिट्रीट' या कार्यक्रमानं या सोहळ्याची सांगता होते.
 
10. बीटिंग द रिट्रिटचा अर्थ काय
 
पूर्वीच्या युद्धांमध्ये सूर्यास्त झाला की युद्ध थांबवलं जायचं, ते थांबल्याची धून वाजवली जायची आणि मग दोन्ही बाजूंचं सैन्य त्यांच्या बराकीत परतायचं. या जुन्या पद्धतीवरुन 'बीटिंग द रिट्रिट' या समारोहाची संकल्पना रचण्यात आली आहे.
 
जगभरातल्या अनेक देशांच्या सैन्यदलांचा असा कार्यक्रम होतो. भारतानेही प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ही परंपरा सामील केली.
 
म्हणजे आता सैन्यदलांचे प्रमुख राष्ट्रपती हे सोहळा समाप्तीनंतर सैन्याला त्यांच्या बराकींमध्ये परतायला सांगतात, असा त्याचा अर्थ.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती