तिरूमला येथील श्रीनिवास

शनिवार, 6 जून 2015 (15:07 IST)
भारतात त्रैमीस पर्वताच्या परिसरात मोठे जंगल आहे. या जंगलात अनेक ऋषिमुनी तप करीत असतात. शौनकादी महामुनींनी सूतमहर्षीना प्रार्थना केली. कलियुगातील श्री व्ंकटेश्वर बालाजीचा महिमा आम्हाला सांगावा. तेव्हा सूतमहर्षीनी तो सर्वाना सांगितला. भृग महर्षी ब्रह्मदेवाच्या दरबारात आले. भृग आणि ब्रह्मदेव यांच्यात वाद झाला. भूलोकात तुझे मंदिर असणार नाही व तुझी पूजा कोणी करणार नाही असा भृगऋषींनी ब्रह्मदेवाला शाप दिला. ते शंकर दरबारात आले. त्यावेळी शंकर-पार्वती एकांतात होते. भूलोकात तुझी लिंग स्वरूपात पूजा होईल, असा शाप भृगूंनी शंकराला दिला. भृगषीनी भगवान विष्णूची परीक्षा घेऊन त्यांच्या वक्षस्थळावर लाथ मारली. त्यामुळे लक्ष्मी रागावून भूलोकी कोल्हापूर येथे जाऊन तप करीत बसली. जाताना तिने भृगूला शाप दिला. ज्या ब्राह्मणाच्या कारणाने आपण दोघे वेगळे झालो त्या ब्राह्मण जातीचे लोक दरिद्री जन्मतील. विद्या विकून ते जगतील.

लक्ष्मीच्या शोधासाठी श्री हरी भूलोकात आले. तिरूमला येथे एका वारुळात श्रीनिवास रूपात तप करू लागले. श्रीहरीला वराह स्वामींनी शेषाचल पर्वतावर जागा दिली. भाविक आधी वराहस्वामींचे दर्शन घेतात नंतर श्रीनिवास (हरी)चे दर्शन घेतात. नारायणपूर ते तिरूपती तीस मैल अंतर आहे. तेथे सुधर्मा राजा राज्य करीत होता. सुधर्माच्या  पत्नीच्या पोटी आकाशराजा नावाने जन्मास आला. आकाशराजा यज्ञस्थानी जमीन नांगरू लागला. त्याला पेटी जमिनीत सापडली. पेटीत कन्या होती. आकाशराजाने तिचे नाव पद्मावती ठेवले. वेंकटाचल पर्वतावर श्रीनिवास (हरी) आई बकुलादेवीबरोबर वाढू लागला. शिकार करणसाठी श्रीनिवास जंगलात गेला. तिथे पद्मावतीचे दर्शन श्रीनिवासाला झाले. पद्मावतीने श्रीनिवासासाठी भिल्लीणीचा वेश घेतला. पद्मावतीची आई धरणीदेवी. वैशाख शुद्ध दशमी शुक्रवारी प्रात:काळी शुभ मुहूर्तावर पद्मावती-श्रीनिवास यांचा विवाह झाला.
 
पुढे आकाशराजाचा मुलगा वसुदान आणि आकाशराजाचा भाऊ तोडमान यच्यात राज्यावरून वैर वाढले. श्रीनिवासाने राज्य दोघात वाटून भांडण मिटविले. पुढे तोडमानने श्रीनिवासासाठी मोठे आल (मंदिर) बांधले. 
 
ब्रह्मोत्सवासाठी ध्वजारोहण, सर्व भूपालनवाहन, चंद्रप्रभा वाहन, हनुमंत वाहन, अश्ववाहन आणि रथ तयार केले. लक्ष्मीदेवी व पद्मावती दोघींना श्रीनिवासाने आपल्या वक्षस्थळी सामावून घेतले. शेषाचलम, वेदाचलम, गरुडाचलम, वृषमाद्रि निलय, अंजनादि निलय आनंदागिरी, वेकंटाचलम या सात पर्वतांवर श्रीनिवासाचे वास्तव्य झाले.
 
जगदीशचंद्र कुलकर्णी

वेबदुनिया वर वाचा