अंबडची मत्स्योदरी - अंबड या मराठवाड्यातील तालुक्यात मत्स्योदरीचे स्थान आग्नेय दिशेकडील डोंगरावर आहे. 'मत्स्यश्वरदरम यास्यासम मत्स्योदरी' या उक्तीप्रमाणे या डोंगराचा आकार माशासारखा असल्यामुळे या देवीला हे नाव पडले असावे. डोंगर समोरून तोंड उघडलेल्या माशासारखा आणि मागील बाजू निमुळती माशाच्या शेपटीसारखी आहे. स्कंदपुराणातील सह्याद्री खंडांतर्गत उपलब्ध कथेनुसार अंबरीश ऋषींनी कठोर तपश्चर्या आणि अनुष्ठाने करून हालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन रुपात इथे देवीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. डोंगरावर जाण्यासाठी पायर्या आहेत. प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजूस देवड्या आहेत. पुढे एक चौक आहे. मंदिराच्या मधल्या चौकट भिंतीवर एक सुंदर शिल्प कोरलेले आहे. तीन मासे आणि त्यांचे एकच तोंड असे हे शिल्प आहे. डोंगराच्या पायर्याशी असलेल्या समाधीत दगडात कोरलेले दोन मानवी पाय दिसतात. अंबरीश राजाची समाधी असे याला म्हणतात.
निलंग्याची हरगौरी- गौरी हे शिवाच्या शक्तीचे रुप मानले गेले आहे. गौरी ही चार हात, तीन डोळे आणि आभूषणांनीयक्त असावी असे म्हटले आहे. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा गावामधल्या एका मंदिरात अशी प्रतिमा आहे. निलंगा येथील नीलकंठेश्वर मंदिर हे त्रिदल पध्दतीचे आहे. मुख्य गर्भगृहात शिवपिंडी असून डावीकडे तीन फूट उंचीची सुरेख अशी विष्णू प्रतिमा आहे. समोर उमामहेश्वर अलिंगन मूर्ती दिसते. शिवाच्या डाव मांडीवर देवी बसली असून शिवाचा डावा हात तिच्या डाव्या खांद्यावर आहे. पीठाच्या पायाशी घोरपडीचे शिल्प आहे. निलंग्याच्या प्रतिमेला शिवपार्वती असे न म्हणता हरगौरी असे संबोधले जाते. शिव म्हणजे हर आणि पार्वतीची होते गौरी. ही हर-गौरीची प्रतिमा साडेचार-पाच फूट उंच आहे. उजव्या वरच्या हातात त्रिशूळ, खालच्या हातात अक्षमाला असून तो हात अभयमुद्रेत दाखवला आहे. गौरीच्या डाव हातात बीजपूरक आहे. शिवाला जटामुकुट असून देवीच्या केसावर फुलांची वेणी आहे. पीठावर शिवाच्या पायाशी नंदी असून देवीच पायाशी घोरपड शिल्पित केलेली दिसते.