श्रीक्षेत्र कनकेश्वर

सोमवार, 9 मार्च 2015 (11:55 IST)
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात श्रीक्षेत्र कनकेश्वर ही तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अलिबागच्या इशान्येला असलेले कनकेश्वर अलिबागपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. उंच डोंगरावर दाट झाडीत लपलेले हे देवस्थान अतिप्राचीन असून त्यास पौराणिक  पार्श्वभूमी आहे. पर्वतावर 750 पायर्‍या चढून दर्शनासाठी जावे लागते. या पायर्‍यांचे आणि पुष्करिणीचे बांधकाम अलिबागच्या राघोजी आंग्रेंचे दिवाण गोविंद रेवादास या दानशूर भाविकाने 1764 मध्ये स्वखर्चाने केले. या सर्व पायर्‍यांमध्ये देवाची एक पारी आहे. देवाने या एका पायरीवर पावलांचा ठसा उमटविला अशी आख्यायिका आहे. या पर्वतावर अनेक देवांची मंदिरे व धर्मशाळा आहेत. कनकेश्वर हे दर्यासारंग आंग्रे घराण्यांचे कुलदैवत आहे. देवस्थानची पूजा, अर्चा व उत्सवाची व्यवस्था आंग्रे यच्याकडूनच होत असे. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे कार्तिकातील त्रिपुरी पोर्णिमेला होणारी जत्रा. कार्तिक शुद्ध 14 ला भरणार्‍या श्री नागेश्वराच्या उत्सवाला जोडूनच हा उत्सव आहे. पूर्वी या यात्रेच्या दिवशी आवास्त येथून गणपतीची, शिरवली येथून भैरवाची तर झिराड येथून देवीची पालखी येत असे. अलीकडे फक्त आवास्त येथील पालखी कनकेश्वरी येते. या देवस्थानची पूजा, अर्चा, देखभाल करण्याचे काम झिराड येथील सालदार गुरव घराण्याकडे वंशपरंपरागत चालत आलेले आहे. 
 
पौराणिक काळात भगवान शंकर आणि कनकासूर यांचे युद्ध झाले ते हे ठिकाण. भगवान परशुरामाने येथे पहिला आश्रम निर्माण करून कन्याकुमारीपर्यंत प्रवास करत अनेक आश्रमांची निर्मिती केली. कनकेश्वरपर्यंत आणि परिसराची निर्मितीही त्याने देवांच्या सांगण्यावरून परशु समुद्रात फेकल्यावर त्यामुळे झाली अशी आख्यायिका आहे. काळ्या पाषाणातील मुख्य मंदिर, अन्य मंदिरे, विपुल झाडी आणि पशुपक्षी विशेषत: माकडे येथे आढळतात. समुद्रसपाटीपासून सुमारे 1200 फुटावर उंची असलेले हे ठिकाण असल्याने मोकळी ताजी हवा आणि मुबलक वारा घेण्यासाठी परिसरातील लोक आणि पुण्या-मुंबईचे लोक येथे पर्यटनासाठी हटकून येतात.

वेबदुनिया वर वाचा