लवकरच वृंदावनात जगातील सर्वात मोठं श्रीकृष्ण मंदिर

बुधवार, 19 नोव्हेंबर 2014 (12:02 IST)
वृंदावन येथे जगातील सर्वात भव्य आणि उंच श्रीकृष्ण मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. हे मंदिर जवळपास 700 फूट उंचीचं असणार आहे. वृंदावन इथे बांधण्यात येणार्‍या या मंदिरासाठी जवळपास 300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
 
वृंदावन येथील चंद्रोदय मंदिराची उंची ही 210 मीटर म्हणजेच 700 फूट इतकी असेल आणि ते दिल्लीच्या कुतूब मिनारच्या तिपटीने उंच असणार आहे. कुतूबमिनारची उंची 72.5 मीटर इतकी आहे. बंगळुरू येथील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिअसनेस म्हणजेच इस्कॉन ही संस्था या मंदिराची उभारणी करत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या मंदिराची अनंत शेष स्थापना पूजा करण्यात आली.
 
या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम 16 मार्च रोजी संपन्न झाला होता. अनंत शेषाच्या मस्तकावर हे संपूर्ण मंदिर उभारण्याची संकल्पना आहे. वृंदावन चंद्रोदय हे मंदिर 70 मजली असणार आहे. या मंदिरात दर्शनासाठी एका कॅप्सूल इलिव्हेटरने भक्तांना 700 फूट उंचीवरील गॅलरीपर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय गॅलरीत 3ऊ साऊंड आणि प्रकाश योजनेद्वारे भक्तांना एका वेगळ्या अनुभूतीचा लाभ करून देण्यात येणार आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी पाच वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. कृष्ण लीला थीम पार्क हे त्यातील प्रमुख आकर्षण असणार आहे. या थीम 
 
पार्कमध्ये संगीतावर आधारित कारंजी, गार्डन लॉन आणि बोटिंगची सुविधा तसेच ब्रज हेरिटेज व्हिलेज आणि गोशाला उभारण्यात येणार आहे.
 
या मंदिरात श्रीकृष्णाच्या वृंदावनाच्या वातावरणाची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन देण्याच्या अक्षय पत्र कार्यक्रमाला असलेले पाठबळही वाढवण्यात येणार असल्याचं समितीतर्फे सांगण्यात आलं आहे.

वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.

वेबदुनिया वर वाचा