नरसिंहपूरचे नृसिंह देवस्थान

मंगळवार, 13 मे 2014 (13:02 IST)
पुणे जिल्ह्याच आग्नेय कोपर्‍यात नीरा-भीमा नद्यांच्या संगमावर नरसिंहपूर येथे असलेल्या श्रीलक्ष्मी-नृसिंह जागृत देवस्थानला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.

श्रीनृसिंह हा ईश्वराच्या दहा अवतारांपैकी चवथा अवतार मानला जातो. हिरण्कश्यपू राक्षसाचा ईश्वरभक्त पुत्र प्रल्हाद याचा त्याच्या पित्याने ‘ईश्वरभक्ती का करतोस?’ म्हणून खूप छळ केला परंतु विश्वाच्या अणु-रेणुत ईश्वराचा अंश असतो हे सिद्ध करण्याचा हेतूने व प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी परमात्म्याने  साक्षात एका खांबातून नृसिंहाच्या स्वरूपात आपले तेजस्वी दिव्य स्वरूप प्रकट करून हिरण्कश्यपूचा वध केला आणि भक्त प्रल्हादाचे व सर्व विश्वाचे विनाशापासून संरक्षण केले.

नर (माणूस) आणि सिंह यांचे संमिश्र स्वरूपातील ईश्वरी तेजस्वी-दिव्य स्वरूप म्हणजेच ‘नृसिंह’ हो. नीरा-भीमा संगमाचा परिसर एकेकाळी अतिशय निसर्गरम्य होता. ऋषी, साधू, तपस्वी व योगी यांच्या निवासाचे हे स्थान होते. कारण श्रीनृसिंहाचे चिरस्थायी वास्तव्य या ठिकाणीच होते. भक्त प्रल्हाद   अनन्साधारण भक्तिभावाने नृसिंहांच ‘वालुकाम मूर्तीची’ पूजा करत असे, हीच वाळूची नृसिंहाची मूर्ती आज या ठिकाणी गाभार्‍यात दृष्टीस पडते.

शेकडो वर्षाचा काळ पुढे जात होता. अनेक जाती-धर्माचे, विविध पंथांचे राजे-सरदार आपल्या कर्तृत्वाच्या खुणा ठेवून काळाच्या पडद्याआड जात होते. चैत्र शु।।1शके 1678 रोजी विठ्ठल शिवदेव सरदार विंचूरकरांनी नृसिंह मंदिर उभारणीस प्रारंभ केला. दोन्ही नद्यांच्या पाण्यात, टेकडीलगत मोठ-मोठय़ा दगडी शिळा आणि शिसे ओतून भव्य असा चबुतरा तयार केला. यावरती भक्कम असा अंडाकृती घाट बांधण्यात आला व त्याच्यावर भक्कम असा बुरूज बांधण्यात आला आणि नंतर भव्य अशा मंदिराची उभारणी करण्यात आली. या वरती उंच शिखर बांधण्यात आले. नृसिंह गाभार्‍याच्या उजव्या बाजूस लक्ष्मी मंदिर दिसून येते. काही सभामंडप, विस्तीर्ण ओवर्‍या आणि भव्य अशी पूर्व व पश्चिङ्क दिशांना प्रवेशद्वारे बांधण्यात आली. नदी पात्रापासून मंदिराची उंची 9 फूट आहे व हे मंदिर उभारणीस त्या काळात सात लाख रुपये खर्च आला व 20 वर्षात बांधकाम पूर्ण झाले. पुढे रामदास, तुकाराम, नामदेव व इतर संतांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य करून याची महती अभंग व श्लोकाद्वारे सर्वत्र पसरवली. तसेच अनेक राज्ये, प्रधान व सरदारांनी देवस्थानास मोठय़ा देणग्या दिल्या व याचे वैभव वाढवले. परंतु दुष्काळ, महापूर, भूकंप व इतर कांही संकटांमुळे 400 ते 450 वर्षाचे मंदिर आज सर्वबाजूंनी दुर्लक्षित झाले आहे.

मागील 50 वर्षाच्या काळात पुरातन अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या. परंतु वीज, पाणी, रस्ते यामुळे पुन्हा भाविकांचा ओढा मंदिराकडे वाढू लागला आहे. विश्वस्त मंडळाकडून अनेक सुधारणा होऊ लागल्या आहेत. या पवित्र तीर्थक्षेत्राच्या सुधारणेसाठी पुरातत्त्व खाते, ग्रामीण विकास खाते व पर्यावरण विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मंदिराचा भव्य प्रमाणात जीर्णोद्धार होणे ही काळाची गरज आहे. नदी पात्रातून घाटाच्या कडेचा होणारा वाळूचा उपसा बंद होणे ही सद्य:काळाची नितांत गरज आहे.

विशेष महत्त्वाचे -

श्रीक्षेत्र नृसिंहपूरला पुराणात पृथ्वीची नाभी असे मानले आहे. सध्या भूशास्त्रज्ञांनी अणुविद्युत केंद्र उभारणीसाठी या ठिकाणाहून 15 कि.मी. अंतरावरील भिवरवांगी गावास पृथ्वीचा केंद्रबिंदू म्हणून गृहीत धरले आहे. येथील श्रीलक्ष्मी मंदिराच्या शिखराच्या पाथनजीक दगडाच फटीतून सतत पाणी ठिबकत असते, यास ‘गुप्तगंगा’ असे म्हणतात. प्रयाग येथे गंगा-यमुना नद्यांचा संगम असून सरस्वती ही गुप्त नदी येथे आहे. नरसिंहपूर क्षेत्राला दक्षिणेचे प्रयाग असे संत तुकारामांनी म्हटले आहे. कारण येथे नीरा-भीमा यांचा संगम व तिसरी ‘गुप्तगंगा’ आहे. टनू या गावी मंदिरासाठी मिळालेली 125 एकर देवस्थानची जमीन आहे. तसेच शासनामार्फत 5655 रुपये नैवेद्यासाठी वार्षिक मानधन दिले जात होते. ते पुढे चालू ठेवण्यात यावे अशी अपेक्षा आहे. प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यात श्रीनृसिंह जयंती नवरात्र उत्सव भक्तिभावाने साजरा होतो. ‘नृसिंह जयंती’ दिवशी भव्य सोहळा संपन्न होतो. याप्रसंगी हजारो भाविक उपस्थित राहतात व आपल्या जागृत दैवतापुढे नतमस्तक होतात.

वेबदुनिया वर वाचा