व्हिडिओ स्टेटस ठेवत युवा शेतकऱ्याची बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगादयामुळे आत्महत्या

सोमवार, 28 मार्च 2022 (15:20 IST)
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पाडे शिवारातील सीग्राम कंपनी लगत शेत असलेल्या संदीप राजेंद्र भुसाळ वय( २४ वर्षे) या युवक शेतकऱ्यांने एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून घेतलेल्या कर्जवसुलीच्या तगादयामुळे आपल्या शेतालगत असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रात्री एक वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. या घटनेबाबत मयताचा मावसभाऊ ज्ञानेश्वर संजय शिंदे रा. वलखेड यांनी घटनेबाबत दिंडोरी पोलीसाना खबर दिली.
 
शिंदे यांनी पोलिसांनी सांगितले की, माझा मावस भाऊ संदीप राजेंद्र भुसाळ  रा. पाडे हा आपल्या आई भाऊ व आजी यांच्यासोबत राहतो व शेती करतो. त्याने शेती व्यवसायासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतले होते.

परंतु गेल्या तीन वर्षापासून  कोरोना परिस्थिती  व शेतीतील कमी उत्पन्नामुळे बँकेचे कर्ज भरू शकला नाही.  बँकेने गेल्या सहा महिन्यापासून  कर्जवसुलीसाठी मोठ्या प्रमाणात तगादा लावल्याने नैराश्यपोटी पाडे शिवारातील त्यांच्या राहत्या घराच्या मागील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये  याबाबतची स्टेटस ठेवले की आपण कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे.

दिंडोरी पोलिसात मृत्यूची नोंद झाली असून  पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस करीत आहे.
 
पाडे येथील युवा शेतकरी आत्महत्या घटनेबाबत चा  प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून  सविस्तर अहवाल लवकर तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठविला जाईल

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती