महापालिका आयुक्तांच्या अंगावर महिलांनी फेकली बाटलीभर शाई

बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (14:54 IST)
अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून चांगलेच राजकारण तापले असून रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकून निषेध नोंदवला आहे. रवी राणा यांच्या महिला कार्यकर्त्यांनी पालिकेत येऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि आयुक्तांना पुतळा का हटवला याचा जाब विचारला. दरम्यान त्यांच्या अंगावर शाई फेकली. 
 
घडलेल्या या प्रकारामुळे आयुक्त गोंधळून गेले. मात्र पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवून या महिला कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर काढले. पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे पालिकेच्या आवारात दुपारी अधिकारी आणि सुरक्षा रक्षकासोबत कचऱ्याची पाहणी करत असताना हा प्रकार घडला. येथे दोन महिला आल्या. एका महिलेने पिशवीतून एक शाईची बाटली काढली. त्यात काही तरी असल्याचं लक्षात आल्याने आयुक्त सतर्कहून पळाले. मात्र आयुक्त एका रिक्षाच्या मागे जात असतानाच एका महिलेने त्यांना घेरले अन् बिसलेरीची बाटली भरून आणलेली शाई आयुक्तांच्या अंगावर ओतली. 
 
सुरक्षा रक्षकाने तेवढ्यात धाव घेऊन आयुक्तांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. नंतर या महिला पळून जात असताना जय भवानी, जय शिवाजीचे नारे हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
 
या प्रकारामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. या महिला आमदार रवी राणा यांच्या समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे.
 
रवी राणा यांनी अमरावतीमधील राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रवी राणा यांनी महापालिकेत केली होती. मात्र कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसवल्याने तो पालिकेने काढला. त्यावरून राजकारण तापलं होतं. आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकून निषेध नोंदवला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती