आमदार रवी राणा अडचणीत; थेट आमदारकीच जाणार

मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (21:49 IST)
विधानसभा निवडणुकीत मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्याच्या आरोपाप्रकरणी आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आमदार राणा यांना लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम १० ए अंतर्गत अपात्र ठरविण्याची कारवाई तातडीने पूर्ण करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.
 
या प्रकरणी सुनील खराटे आणि सुनील भालेराव यांनी आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यावर नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. आमदार राणांविरुद्ध कारवाई सुरू करण्याबाबत नोटीस जारी केली असून, कारवाई सहा महिन्यात पूर्ण केली जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने न्यायालयाला दिली. आयोगाची बाजू ऐकल्यानंतर राणा यांना अपात्र ठरविण्याची कारवाई त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
 
दरम्यान, आमदार राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केले होते. शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंद अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेऊन त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. न्यायालयाने राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द करत दोन लाखांचा दंडही ठोठावला होता. नवनीत राणा यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर फेरविचार करावा अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती