पवारांवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे शिवसेना अनंत गीतेंवर करणार कारवाई?- खासदार संजय राऊत

बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (16:30 IST)
राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असून शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत.आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती.अनंत गीतेंच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी जाहीर केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रतिक्रिया देत शरद पवार देशाचे नेते असल्याचं म्हटलं होतं.तसेच महाराष्ट्रातील सरकार चांगलं चाललंय.त्यामुळे गीते सारख्या लोकांच्या वक्तव्यांची दखल घेत नाही,असंही राऊतांनी म्हटलंय.

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरीही त्यांचं नाव शरद पवार यांनी सुचवलं होतं. या महाविकास आघाडी सरकारची त्यांनी पायाभरणी केली. त्यामुळे ते आमचे नेते आहेत. अनेक वर्ष आमचे त्यांच्याशी राजकीय मतभेद होते. पण बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार अनेक वेळा एकाच व्यासपीठावर सोबत होते. शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करावं, असं अनेकदा बाळासाहेबांनी बोलून दाखवलं होतं. त्यामुळे पवारांबद्दल आमच्या मनात आदराची भावना आहे. त्यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे,” असं राऊत म्हणाले. दरम्यान,“स्थानिक पातळीवरच्या संघर्षाबद्दल गीते यांनी अशी वक्तव्ये करणं पक्षाच्या नियमात बसत नाही.गीते यांची भूमिका ही वैयक्तिक आहे पक्षाची नाही. गीतेंनी हे वक्तव्य करण्यामागे त्यांची कारणं असतील,त्यांच्या भावना असतील पण सरकारमधील एका महत्वाच्या नेत्याविषयी जाहीरपणे असं व्यक्त होणं, चुकीचं आहे.अनंत गीतेंवर कारवाई करायची की नाही, हे उद्धव ठाकरे ठरवतील,” असं राऊतांनी म्हटलंय.

काय म्हणाले होते अनंत गीते…
“काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, एकमेकांचे कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का ? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे.” असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती