मुंबई : ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांच्यावर अलीकडेच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावेळी विधानपरिषदेच्या सभागृहात याची गंभीर दखल घेण्यात आली होती. या मुद्यावरुन भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव मांडला होता. त्यावरील चर्चेअंती सुषमा अंधारेंनी येत्या आठ दिवसांत दिलगिरी पत्र दिले नाही तर त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देऊ, असा इशारा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला होता. त्यामुळे सुषमा अंधारे या सगळ्यावर काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
अखेर सुषमा अंधारे यांनी एका जाहीर पत्राद्वारे आपली भूमिका सविस्तरपणे मांडताना माफी मागण्यास नकार दिला आहे. माझ्याकडून एखादा गुन्हा घडला असता तर मी बिनशर्त माफी मागितली असती पण पक्षीय राजकारणातील कुरघोडीचा भाग म्हणून कोणी मला झुकवू पाहत असेल तर मी ते कदापि सहन करणार नाही.भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे, असे सुषमा अंधारे यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार का, हे पाहावे लागेल.