“पंढरपूरमधील पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देणार का?”

मंगळवार, 4 मे 2021 (08:06 IST)
“पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा ३७३३ मतांनी पराभव केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आघाडी विरोधात भाजपा अशी प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढतीत भाजपाने बाजी मारली. अजित पवारांसहित राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस यश मिळवू शकली नाही. दरम्यान या पराभवानंतर अजित पवारांचा राजीनामा मागणार का? अशी विचारणा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
पश्चिम बंगालमधली पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. यासंबंधी बोलताना आशिष शेलार यांनी म्हटलं की, “अर्धवट माहितीच्या आधारावर पत्रकार परिषद घेणे म्हणजे नवाब मलिक. मोफत लस म्हणून ते तोंडावर आपटले आहेत. खोटी माहिती त्यांनी देऊ नये. तेच नवाब मलिक गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्या असे बोलत आहेत. मग पंढरपूरमध्ये त्यांच्या पक्षाला अपयश मिळाले म्हणून नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मागणार का?”.
 
नाना पटोलेंवर टीका –
“नाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं. नाना पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाही. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही, माहितीविना बोलणं म्हणजे कालाकांडी,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती