बालभारतीच्या कवितेवरुन इतका का आहे 'शोर'? सगळेच का म्हणत आहेत 'नो मोअर'?

बुधवार, 24 जुलै 2024 (14:19 IST)
BALBHARATI
Photo courtesy -BALBHARATI
सोशल मीडियावर इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकात असलेल्या 'जंगलात ठरली मैफल' या कवितेवरून सध्या वाद होतोय. या कवितेवरून बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या दर्जावर, निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
बालभारतीने देखील या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या सहा वर्षांत हा वाद नव्हता निर्माण झाला पण आता वाद झाल्यानंतर पुन्हा यावर विचार करण्यात येईल असे बालभारतीने सांगितले आहे.
 
पण, या कवितेचा आशय नेमका काय आहे? सोशल मीडियावर वाद का होतोय? यावर शिक्षणतज्ज्ञांचं मत काय? हेच आपण पाहुयात.
 
2020 - 2021पर्यंत बालभारतीच्या पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात सगळ्यांत शेवटच्या भागात 'जंगलात ठरली मैफल' या शीर्षकाची एक कविता होती. त्यानंतर 2021-2022 या सत्रात एकात्मिक आणि द्विभाषित शिक्षण पद्धती सुरू करण्यात आली.
 
त्यानुसार बालभारतीने मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकाचे चार भाग केले. यामध्ये सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये मराठी, इंग्रजी, गणित असे विषय दिसतात.
इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकाच्या भाग चौथ्यामध्ये 'जंगलात रंगली मैफल' ही कविता आताही आहे. त्यावरूनच सध्या वाद होतोय.
 
पण, हा वाद नेमका काय आहे?
या अस्वल, हत्ती, कोल्हा, वाघ, लांडगा, मुंगी, ससा, अशा प्राण्यांचा उल्लेख आहे. पण, या कवितेत काही हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे.
 
यामध्ये बात, शोर असे हिंदी शब्द, तर माउस, वन्समोअर अशा इंग्रजी शब्दांचा वापर झालाय. त्यामुळे या कवितेवर आक्षेप घेतला जातोय.
ही कविता कोणत्या निकषांवर बालभारतीच्या पुस्तकात निवडण्यात आली? असा सवाल सोशल मीडियावरून विचारला जातोय.

या कवितेवरून आताच का वाद होतोय?
ही कविता जुन्या पुस्तकांमध्ये देखील होती. पण, तेव्हा या कवितेवरून वाद निर्माण झाला नाही. सोमवारी 22 जुलैला हा वाद निर्माण झालाय. ‘मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजे’ या नावानं फेसबुकवर ग्रुप आहे. या ग्रुपचे सदस्य संदीप जोशी यांनी सोमवारी सकाळी या कवितेचा फोटो या ग्रुपमध्ये शेअर केला.त्यांनी या कवितेतील इंग्रजी भाषेवर आक्षेप घेतला.
 
"हे आहे महाराष्ट्र शासनाचे बालभारतीचे इयत्ता पहिलीचे पुस्तक. कवितेच्या ओळींमध्ये लिहिलं आहे वन्स मोअर वन्स मोअर झाला शोर. किमान मराठी भाषा शिकवताना मराठी शब्द वापरायला हवेत असं वाटत नाही का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच इतरांनाही त्यांनी या कवितेवर मत विचारलं.
या पोस्टवर उन्मेष इनामदार यांनी प्रतिक्रिया दिली असून ही कविता पाठ्यपुस्तकात घालण्यासाठी कोणी निवडली याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय.
 
ते म्हणतात, "या कवितेत परभाषेतले शब्द वापरले आहेत यापेक्षाही अधिक आक्षेपार्ह म्हणजे यमकं जुळवण्याची कवयित्रीची धडपड इयत्ता पहिल्याच्या मुलांनीही कीव करावी इतकी केविलवाणी आहे. एवढी धडपड करून जी कविता केली आहे ती तालात म्हणण्यासारखी नाही. बालसाहित्य म्हणून या कवितेचे साहित्यमूल्य शून्य आहे," इनामदार सांगतात. या फेसबुक पोस्टनंतर अनेकांनी या कवितेवर आक्षेप घेतले. ही कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी या कवितेची कवयित्री पूर्वी भावे यांच्यासह बालभारतीवर टीकेची झोड उठवली आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी या कवितेची निवड कुणी आणि का केली? असा सवाल सोशल मीडियावरून उपस्थित केला आहे. तसेच अभिनेते अक्षय शिंपी यांनीही बालगीतांचं महत्व सांगत एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात, "बालकविता, बडबडगीत लिहिणं ही फारच जबाबदारीची गोष्ट आहे. मॅड विचार, कल्पनाविलास, अद्भूतरम्यता, भाषा वाकवायची क्षमता, तिच्या खेळण्याची क्षमता, गेयता आदी बाबींचा इथं कसं लागतो. बडबडगीतांना उच्च साहित्यमूल्य असतं.
 
"शिशूवर्गात असताना शिकलेली बडबडगीतं पिढ्यानुपिढ्या नदीसारखी प्रवाही असतात. दोष कवयित्रीचा आणि कवितेचा असण्यापेक्षा ती निवडणाऱ्यांचा आहे," असं अभय शिंपी म्हणतात. तसेच लेखक जगदीश काबरे यांनीही बालभारतीनं या कवितेची निवड कशी काय केली? असा प्रश्न उपस्थित केलाय.
 
या कवितेसह बालभारतीवर टीका तर होतेच आहे. पण, काही जणांनी या कवितेचं समर्थन देखील केलंय. महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या अधिकारी शिल्पा मेनन यांनी पूर्वी भावे यांची बाजू घेत म्हटलंय, "पूर्वी भावेचे फोटो टाकून तिला ट्रोल करणं, तिच्याबद्दल घाणेरड्या कमेंट्स करणं हे किती किळसवाणे आहे. यात बायका पण मागे नाहीत. बालभारतीत जा, निषेध करा, काय करायचंय ते करा. पण, तिची काय काय चूक?"
 
पूर्वी भावेंचं म्हणणं काय?
पूर्वी भावे या माध्यम क्षेत्रात कार्यरत असून नृत्यांगना म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. तिसऱ्या वर्गात असताना ही कविता लिहिल्याचं त्यांनी स्वतः फेसबुक पोस्टमधून सांगितलं आहे.
 
त्यांनी 15 डिसेंबर 2018 मध्ये फेसबुक लिहिलं होतं की, "एक आनंदाची बातमी जरा उशिरा शेअर करतेय. इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात माझी कविता अभ्यासाल आहे. ही कविता मी स्वतः तिसरीत असताना लिहिली होती. वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती, वाद्यांची माहिती आणि कवीचं वय या निकषांवर ही कविता शैक्षणिक समितीने निवडली," असं त्या सांगतात.
 
सोबतच ही एक वेगळी ध्येयपूर्ती आहे असं म्हणत आनंदही व्यक्त करतात. याचवेळी त्यांनी मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "माझ्या आईनं या कवितेला चाल लावली होती. आईनं माझ्या कवितांचा एक अल्बम तयार केला होता. निवड समितीकडे ही कविता पोहोचली तेव्हा कवितेचा विषय त्यांना भावला. त्यांना हव्या असलेल्या विषयाला धरूनच ही कविता होती म्हणून त्यांनी कवितेची निवड केली."
 
पण, सध्या पूर्वी भावे या कवितेवरून सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. याबाबत आम्ही त्यांना संपर्क केला. पण, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
या कवितेवरून सोशल मीडियावर टीका-टिप्पणी होताच आम्ही शिक्षणतज्ज्ञांचंही मत जाणून घेतलं. अभ्यासक्रम पुनरर्चना समितीचे माजी सदस्य आणि अॅक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर या कवितेच्या रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
 
बीबीसी मराठीसोबत बोलताना ते म्हणाले, "कवितेत हिंदी, इंग्रजी शब्द आहेत त्यावर आक्षेप नाही. पण, ही कविता म्हणून अत्यंत सुमार आहे. यात वापरलेले अलंकार अत्यंत टुकार दर्जाचे आहेत. ट ला ट, फ ला फ जोडून ही कविता तयार केली आहे. लहान मुलांच्या कवितेत गेयता, मजा असायला हवी. कवितेतील शब्दकळा मुलांना रंजक वाटली पाहिजे. मुलांना झाडं, वेली, प्राणी, पक्षी आवडतात म्हणून कुठल्याही रचनेत या गोष्टी उधार उसनवार घेऊन बडबडगीत होऊ शकत नाही. या सुमार रचनेपेक्षा अनेकानेक उत्तम कविता मराठीत आहेत."
 
'हा वाद निरर्थक'
शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांना हा वाद निरर्थक वाटतो. ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "वन्समोअर वन्समोअर हे शब्द वापरणं यात चुकीचं काय आहे? हे शब्द वापरून काय बिघडतं? एखाद्या भाषेला इतकं शुद्ध करण्याचा प्रयत्न केला तर ती भाषा मरून जाण्याचा धोका असतो. ज्यांची भाषेच्या प्रवाहीपणाशी सहमती आहे, ते असा वाद निर्माण करणार नाहीत."
 
मराठी माध्यमाचं लहान मुलांसाठीचं पुस्तक नेमकं कसं असावं? याबद्दल भाऊसाहेब चासकर सविस्तरपणे सांगतात. ते म्हणतात, "शिक्षणाचा आशय आणि मुलांचे भावविश्व, अनुभवविश्व याचा मेळ घातलेला असला पाहिजे अशी अपेक्षा असते. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांचा आशय आणि बहुसंख्य मुलांचे सांस्कृतिक भांडवल याची फारकत बघायला मिळते. अशा कवितेच्या निवडीवरून निवड समिती सदस्यांच्या बालसाहित्यविषयक जाणिवा आणि आकलनाबाबत शंका उपस्थित केल्या जातात."
 
"बालभारती ‘वन्समोअर’च्या पातळीवर प्रयोग करत असेल तर महाराष्ट्रातल्या भाषा वैविध्याचा म्हणावा तितका आदर पाठ्यपुस्तकात का होत नाही? आपल्याकडे वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक पृष्ठभूमीची मुलं येतात. त्यांना शिक्षणप्रक्रिया आपली वाटायची असेल तर शिक्षणाचा आशय जवळचा वाटायला हवा. त्यादृष्टीनं प्रयत्न झाले पाहिजेत. पण, तसं होताना दिसत नाही. शिक्षणाचा आशय अत्यंत सजगपणे निवडायला पाहिजे. मुलांचं अनुभविश्व-भावविश्व माहिती, साहित्याची जाण असलेल्या, शिक्षणशास्त्राच्या जाणकार व्यक्ती समितीत असल्या पाहिजेत," असं चासकर यांना वाटतं.
 
बालभारतीची प्रतिक्रिया
पण, बालभारतीमध्ये एखादा विषय कसा निवडला जातो? त्याची काही प्रक्रिया असते का? याबद्दल बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील सांगतात, निवड समितीसाठी विषयांचे अर्ज मागवले जातात. त्यावर त्यांची बैठक होते. त्यातून अभ्यासक्रमाची निवड झाल्यानंतर बालभारतीमध्ये पाहणी केली जाते. त्यातून निर्णय झाल्यावर त्रयस्थ व्यक्तीकडून पाहणी होते. त्यानंतर त्यावर सूचनांची प्रक्रिया होते.
 
सध्या ज्या पूर्वी भावे यांच्या कवितेवरून सोशल मीडियावर वाद सुरू आहे त्याबद्दल पाटील बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "हे बडबडगीत आहे. आता वाद सुरू झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव आम्ही अभ्यासगटाकडे पाठवत आहोत. त्यानुसार निर्णय होईल. गेल्या 6 वर्षांमध्ये कोणी आक्षेप घेतला नाही."
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती