चिकनगुनियाने महाराष्ट्रात अचानक डोकं वर का काढलंय? कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (17:59 IST)
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या चिकनगुनिया, डेंग्यू, हिवताप या विषाणूजन्य आजारांनी थैमान घातले आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 7 ऑगस्टपर्यंत डेंग्यूचे 6751 रुग्ण, हिवतापाचे 8730 तर चिकनगुनियाचे 1515 रुग्ण आढळून आले आहेत.
डेंग्यूमुळे चार जणांचा मृत्यू झाला असून हिवतापामुळे तीन जणांना जीव गमावावा लागला.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि महापालिकांमध्ये या आजारांचे सर्वाधिक रुग्ण आहेत? चिकनगुनियासारख्या आजारानं अचानक डोकं वर का काढलं? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 7 ऑगस्टपर्यंत हिवतापाच्या एकूण रुग्णांपैकी गडचिरोली (3557 रुग्ण), मुंबई (3226 रुग्ण), रायगड (235 रुग्ण) आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण या तीन जिल्ह्यांमध्ये आढळून आले आहेत.
राज्यात 1 जानेवारी ते 7 ऑगस्टपर्यंत 6751 रुग्ण आढळून आले असून 1216 रुग्ण एकट्या मुंबईत असून नाशिकमध्ये 780, तर कोल्हापूरमध्ये 694 रुग्णांना डेंग्यूचं निदान झालं. या तीन जिल्ह्यांमध्ये राज्यातील 40 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईत दिवसाला 30 , तर कोल्हापुरात दिवसाला 15 डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. ही सर्व सरकारी रुग्णालयात नोंदवलेली आकडेवारी आहे.खासगी रुग्णालयात उपचार घेणारे रुग्णांचा यात समावेश नाही.
गेल्या वर्षी चिकनगुनिया आजाराचा प्रादूर्भाव फार नव्हता. पण यावर्षी या आजारानं अचानक डोकं वर काढलं. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात चिकनगुनियाचा प्रभाव जास्त दिसतोय.
कोल्हापूर महापालिका क्षेत्रात दिवसाला 26, नागपूर महापालिकेत दिवसाला 15 तर मुंबई महापालिकेत दिवसाला 13 रुग्ण आढळून येत आहे. या आजाराचे रुग्ण जरी वाढत असले तरी मृत्यूचा दर शून्य आहे. त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचं डॉक्टर सांगतात.
चिकनगुनियाचे रुग्ण का वाढले?
या डासांची अंडी वर्षभर बिनापाण्याची असतात. त्यांना पावसांत पाणी मिळालं की त्यांचं डासांमध्ये रुपांतर होते. अंड्यापासून अळी, अळीपासून कोश आणि त्यानंतर हा डास तयार होतो.
प्रत्येक तयार होणारा डास हा विषाणूचा वाहक असतो. या डासांसाठी पावसाळ्यात पोषक वातावरण असतं.
यावर्षी सार्वजनिक आरोग्य विभागानं स्क्रिनिंग वाढवलं आहे. चाचण्यासुद्धा वाढवल्या आहेत. त्यामुळे चिकनगुनिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढलेले दिसतात, असं राज्य किटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
चिकनगुनिया म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आहेत?
चिकनगुनिया हा अरबो व्हायरस या विषाणूमुळे होणारा व एडिस इजिप्ती डासामुळे पसरणारा आजार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानुसार स्वाहिली भाषेतील शब्दापासून या आजाराच्या नावाची उत्पत्ती झाली आहे.
पाण्याची पिंपं, नारळाच्या करवंट्या, फुलझाडाच्या कुंड्यांमध्ये साचलेलं पाणी, पाणी भरायचे रांजण आणि माठ यामध्ये साचलेल्या पाण्यात एडीस इजिप्ती डासाच्या अळ्या वाढतात. आठ दिवसांत त्याचे डास तयार होतात.
आपण एक दिवस कोरडा पाळला तर खंड पडून अळ्यांपासून डास तयार होत नाही. त्यामुळे आडवड्यातला एक दिवस तरी कोरडा पाळायला हवा.
चिकनगुनिया पसरवणारा डास चावल्यानंतर साधारणपणे तीन ते सात दिवसांत लक्षणं दिसायला लागतात. यामध्ये थंडी वाजून ताप येणं, गुडघे दुखणं, सांधेदुखी, सांधे सुजणं, त्यांची हालचाल करताना वेदना होणं, डोकेदुखी, अंगावर पुरळ येणं, मळमळ होणं आणि उलट्या होणं ही या आजाराची लक्षणं आहेत.
चिकनगुनियावर उपाय काय आहेत?
चिकनगुनिया आजारावर विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत.
हा आजार झाल्यानंतर लक्षणांनुसार उपचार केले जातात तसेच वेदनाशामक औषधं घेऊन रुग्णांना आराम करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे रुग्णांना लवकर बर होण्यास मदत होते, असंही आरोग्य विभागानं म्हटलंय.
पण, आपल्याला डास चावू नये याची काळजी करणं महत्वाचं आहे.
नागपुरात चिकनगुनियाचे 12 दिवसांत 92 रुग्ण
चिकनगुनियाचे रुग्ण नागपूर शहरात वाढले आहेत. 2023 ला नागपुरात चिकनगुनियाचे फक्त 4 रुग्ण होते. पण यंदा चिकनगुनियाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत.
1 जानेवारी 2024 ते 12 ऑगस्टपर्यंत चिकनगुनियाचे 926 संशयित रुग्ण आढळले असून यापैकी 210 जणांना चिकनगुनियाचं निदान झालं आहे. 1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या 12 दिवसांच्या कालावधीत 452 संशयित रुग्णांपैकी 92 जणांना चिकनगुनियाचं निदान झालं आहे.
ही फक्त महापालिकेकडे नोंद असलेली आकडेवारी आहे. पण, खासगी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची संख्या आणखी मोठी असल्याची शक्यता आहे. तसेच याच 12 दिवसांत डेंग्यूच्या 22 रुग्णांची नोंद झाली.
पण, यंदा असं काय घडलं की चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे.
याबद्दल नागपूर महापालिकेच्या साथरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठमती सांगतात, “आधी डेंग्यू आणि चिकनगुनियाची चाचणी इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात व्हायची. पण, यंदा महापालिकेनं पुणे एनआयव्हीकडून चाचणीसाठी कीट मागवल्या असून महापालिकेच्या सेंटरवर सगळ्या चाचण्या केल्या जातात. चाचण्याचीं संख्या वाढल्यामुळे कदाचित चिकनगुनियाचे रुग्ण देखील वाढले असतील.
पण, वातावरणातील बदलही याला कारणीभूत आहे. कारण पाऊस अपुरा पडतोय. सलग पाऊस पडला तर मादी डासांची ब्रिडींग असते ती वाहून जाते. पण पाऊस अपुरा पडला तर साचलेल्या पाण्यात या डासांची वाढ होते. यावर्षी असंच घडत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची शक्यता आहे.”
नागपूर महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर ELISA IGM कीटद्वारे सिरम सॅम्पल घेऊन डेंग्यू आणि चिकनगुनियांची अँटीबॉडी टेस्ट केली जाते. त्यामधून रुग्णांना चिकनगुनिया की डेंग्यू झाला याचं निदान केलं जातं, असं डॉ. मठपती सांगतात.
घरात कुठं पाणी साचलं असेल तर लगेच फेकून द्यावे आणि स्वच्छता राखण्याचा सल्लाही त्या देतात.
डेंग्यू म्हणजे काय आणि निदान कसं होतं?
डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार एडीस इजिप्ती या डासापासून होतो. डेंग्यूचं निदान NS1, Igm आणि IgG या तीन रक्ताच्या चाचण्या करून केलं जातं.
डास चावल्यानंतर 4 ते 10 दिवसांत लक्षणं दिसून लागतात आणि 2 ते 7 दिवसांपर्यंत कायम राहतात. डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं, मळमळ, अंगाजवर सूज, चट्टे येणं अशी लक्षणं दिसतात.
डेंग्युमुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. एक घन मिलीलीटर रक्तात 1.5 लाख ते 4.5 लाख प्लेटलेट्स असणं गरजेचं असतं. पण, हे प्रमाण जास्त कमी होत असेल तर त्या रुग्णाला डेंग्यूचं निदान केलं जातं.