अजित पवार गटातल्या नेत्यांच्या फ्लेक्सवर अजूनही शरद पवारांचे फोटो का दिसतात?
मंगळवार, 11 जुलै 2023 (15:50 IST)
अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार सध्या ठिकठिकाणी शक्तीप्रदर्शन करत आहेत. त्यावेळी त्यांच्या फलकांवर शरद पवार यांचा फोटो दिसतोय.अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेऊन आठ दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बऱ्याच उलथापालथी पाहायला मिळाल्या.
शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या गटाकडून हकालपट्टी विरुद्ध हकालपट्टीचा सामनाही रंगला. 5 जुलै 2023 रोजी बंडानंतर घेतलेल्या पहिल्या जाहिर सभेनंतर अजित पवारांनी स्वत: शरद पवारांवर तिखट शब्दांत वार केल्याचंही महाराष्ट्रानं पाहिलं.
असं सगळं असुनही, अजित पवारांच्या गटातील नेत्यांच्या बॅनरवर, फ्लेक्सवर शरद पवारांचा फोटो पाहायला मिळतात. छगन भुजबळ, दिलीप-वळसे पाटील यांन त्यांच्या मतदारसंघांत शक्तिप्रदर्शन घेतल्या तेव्हाही शरद पवारांचा फोटो होता. अजित पवारांकडून पुणे शहरात राष्ट्रवादीमध्ये नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्या नेत्यांच्या बॅनरवरही शरद पवार दिसतातच. शरद पवारांच्या फोटोला अजित दादांचा गट वेगळा का सारू शकत नाहीये, याचा आढावा या स्टोरीमधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांचं शक्तिप्रदर्शन
अजित पवरांच्या बंडानंतरची पहिलीच सभा शरद पवारांनी नाशिक जिल्हातल्या येवल्यात घेतली. येवला हा कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असल्याने या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. 5 जुलै रोजी अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत तुम्ही थांबणार आहात की नाही, असा सवाल केला होता. या सभेत बोलताना शरद पवारांनी 'माझ्या वयाचा उल्लेख कराल, तर महागात पडेल,' असा इशाराही दिला.
याच दिवशी छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन केलं. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळेस त्यांच्या स्वागताचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते. पण त्या फलकांवर शरद पवारांचा फोटो होता.
तर दुसरीकडे 9 जुलै रोजी दिलीप वळसे पाटील यांनी मंचरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी रोहित पवारांमुळं साहेबांची साथ सोडली, असं म्हणत रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
पण यावेळीही स्टेजवरच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो होता.
बंडखोरी केलेल्या नेत्यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो का दिसतोय?
अजित पवारांकडून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड करण्यात आली. अजित पवारांसोबत जाताना स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनीही शरद पवारांना दूर सारलेलं दिसत नाही.
या बाबतीत बीबीसी मराठीसोबत बोलताना प्रदीप देशमुख म्हणाले की, “शरद पवार आम्हाला श्रद्धेय आहेतच. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कुठलाही राग किंवा कटूता नाही. साहेब आमचे नेते आहेत. कटूता नाहीये. पूर्वी साहेब स्वत: निर्णय घ्यायचे. आता साहेबांना काही मंडळींनी घेरलेलं आहे. यामुळे काही निर्णय व्यवस्थित होत नाहीयेत. आमच्या दृष्टीने पवार साहेब आमचे दैवत आहेत. त्यांचा फोटो आम्ही टाकणारच. साहेब जरी आमच्यावर चिडले असले तरिही आमचं त्यांच्यावरचं प्रेम कमी झालेलं नाहीये. ते जरी रागावले असतील तरीही त्यांच्याबद्दलचं प्रेम कमी कसं होणार.”
आपली लढाई साहेबांशी नाही
मंचरमध्ये घेतलेल्या सभेत दिलीप वळसे पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. पण यावेळी शरद पवारांसोबत वैर नाही असं त्यांनी सांगितल्याचं एबीपी माझाने दिलेल्या बातमीत म्हटलेलं आहे.
आपली लढाई साहेबांशी नाही. मी तर उलट सांगेन, आपल्या आंबेगावमध्ये जेव्हा सभा होईल तेव्हा तुम्ही सगळे त्या सभेला आवर्जून जा. असं दिलीप वळसे-पाटलांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटल्याचं त्यात म्हटलेलं आहे.
आपल्याविषयी जास्त नकारात्मकता निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न
अजित पवार गटाची ही रणनिती असावी का या प्रश्नाचे उत्तर देताना दैनिक पुढारी वृत्तपत्राचे प्रतिनिधी पांडूरंग सांडभोर यांनी सांगितलं की, उद्धव ठाकरेंना निर्माण झाली तशी सहानुभूती शरद पवारांसाठी निर्माण होतेय. या सहानुभूतीला छेद देण्यासाठी आणि आपल्याविषयी जास्त नकारात्मकता निर्माण होऊ नये यासाठी हे सगळं सुरू असावं.
“यामध्ये स्पष्ट चित्र असं आहे की, शरद पवारांशिवाय राष्ट्रवादी ही कल्पना अशक्य आहे. आत्तापर्यंत 25 वर्षांच्या कालखंडातल्या राष्ट्रवादीच्या वाटचालीचा पवार हाच चेहरा राहिलेले आहेत. दुसरा कुठलाच नेता नव्हता. अजित पवार जरी महाराष्ट्र पातळीवर होते तरीही, साहेबांचे पुतणे म्हणूनच त्यांची आतापर्यंतची इमेज राहिलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की, उद्धव ठाकरेंना निर्माण झाली तशी सहानुभूती शरद पवारांसाठी निर्माण होतेय. तर ही सहानुभूतीला छेद देण्यासाठी आणि आपल्याविषयी जास्त नकारात्मकता निर्माण होऊ नये यासाठी हे सगळं सुरू आहे.
अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, जे आमदार अजित दादांबरोबर गेले आहेत, त्यांच्यासमोर दादांनी भुमिका हीच मांडली होती की, आपण राष्ट्रवादी सोडून भाजपसोबत जाणार नाही. तर राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच भाजप सोबत जाणार आहोत. तम्हाला घड्याळ्याचंच चिन्ह असेल, असं आश्वासन त्यांनी आमदारांना दिलं. पण दादांची भुमिका हीच आहे की आम्ही राष्ट्रवादीच आहोत आणि म्हणून ते शरद पवारांचा फोटो वापरताना दिसत आहेत,” पांडुरंग सांडभोर यांनी सांगितलं.
पुर्णपणे शरद पवार विरोधी भुमिका घेणं अजित पवारांसाठी अवघड
महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांच्या म्हणण्यानुसार पुर्णपणे शरद पवारांच्या विरोधातली भुमिका घेणं ही अजित पवारांसाठी अडचणीचं आहे.
“राष्ट्रवादी हा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि शरद पवार संस्थापक आहेत. जसं एकनाथ शिंदे गटाला, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढताच येऊ शकत नाही. तसं अजित पवार गटाला शरद पवार यांचा फोटो तत्वत: काढता येऊ शकत नाही. अजित पवारांनी जरी शरद पवारांबदद्ल तुम्ही थांबा अशी जरी भुमिका घेतली असेल तरीही, त्यांना एकदम शरद पवारांच्या विरोधातली भुमिका घेण अवघड आहे. ते फक्त वयाचंच कारण दाखवू शकतात. दुसरं कुठलंही कारण दाखवू शकत नाहीत.
एकनाथ शिंदेंच्या बाबतीत बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते. कोणीतरी व्हिलन लागणार. अजित पवारांनी तो व्हिलन म्हणून जयंत पाटलांकडे बोट दाखवून आरोप केले आहेत पण ते टिकाव धरू शकणार नाही. कारण जयंत पाटलांपेक्षा जास्त कधीही अजित पवारांना मिळालेलं आहे. ही त्यांची अडचण आहे. त्यांच्यासमोरची अडचण ही वेळेनुसारच सुटू शकेल. आरोप केल्यामुळे अजित पवारांसमोरची ही अडचण सुटणार नाही. पवार हे काळासोबतचे नेते आहेत. ते तसं असणं हीच या नेत्यांसमोरची अडचण आहे,” असं प्रशांत आहेर यांनी सांगितलं.
आदरणीय पवार साहेबांवर बोलायची गरज नाही
तर दुसरीकडे माजी मंत्री तथा रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या जहरी टिकेचा समाचार अजित पवार गटात गेलेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी समाचार घेतला.
शरद पवार सैतान आहेत आणि या सैतानाला त्याचे पाप सध्या फेडावे लागत आहे. पवारांवर नियतीने, काळाने मोठा सूड उगवला आहे. शरद पवार यांना त्यांचे पाप फेडावे लागत आहे, अशी जहरी टीका यांनी केल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झालं.
सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याचा रुपाली चाकणकरांनी समाचार घेतला.
“आदरणीय पवार साहेबांच्याबद्दल बोलताना अतिशय संतापजनक विधाने करणाऱ्या विधानपरिषदेचे माजी आमदार सदाभाऊ खोत यांचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. सदाभाऊ खोत यांनी आदरणीय पवार साहेबांबद्दल केलेलं वक्तव्य हे त्यांच्या बौद्धिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आपला आवाका आणि कुवत बघून त्यांनी बोलावं. राष्ट्रवादी काय आहे हे आपण सांगण्याची गरज नाही, ज्या माणसाला पक्ष स्थापन करून 4 कार्यकर्ते जमवता आले नाहीत त्यांनी देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या आदरणीय पवार साहेबांवर बोलायची गरज नाही,” असं ट्वीट रुपाली चाकणकरांनी केलेलं आहे. यानंतर मात्र चाकणकर यांनी ते ट्वीट डिलीट केलं आहे.