उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. मात्र, यानंतर राजकीय घमासानही झाल्याचे पाहायला मिळाले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे दिसले. यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोणाचा दसरा मेळावा पाहिला, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अमित ठाकरेंनी केवळ एका वाक्यात सडेतोड उत्तर दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नव्या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत अमित ठाकरे मराठवाडा महासंपर्क अभियान राबवत आहेत. यावेळी अमित ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. अमित ठाकरे यांना दसरा मेळाव्याबाबत विचारणा करण्यात आली. तुम्ही कोणाचा दसरा मेळावा पाहिला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की, उद्धव ठाकरे यांचा पाहिला, यावर अमित ठाकरेंनी लगेचच अगदी थोडक्यात उत्तर दिले.
मी कोणताही दसरा मेळावा पहिला नाही
मी कोणताहीच दसरा मेळावा पहिला नाही, असे अमित ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच मराठवाडा संपर्क अभियानाबाबत अमित ठाकरे यांनी माहिती दिली. मनसे विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी हा दौरा आहे. गणेशोत्सव नवरात्रीमुळे तो थांबलेला होता मात्र आता तो पुन्हा सुरू केलाय. ज्यांना विद्यार्थी सेनेत काम करायचे आहे. अशा नवीन विद्यार्थ्यांना तरुण-तरुणींना भेटणार आहे. विद्यार्थी सेनेचा आढावा घेणार आहे. त्यानंतर मनसेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन राजसाहेबांपर्यंत पोहोचवणार आहे, असे अमित ठाकरे म्हणालेत.