उद्धव ठाकरेंना 'नंबर-1' ठरवणारी प्रश्नम संस्था कोणाची आहे?

शुक्रवार, 16 जुलै 2021 (00:05 IST)
मयांक भागवत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशात 'नंबर-1' चे मुख्यमंत्री आहेत, अशा आशयाच्या बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत.
 
व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि सोशल मीडियावर, उद्धव ठाकरे 'नंबर-1' मुख्यमंत्री, अशा बातम्या आणि पोस्ट शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर व्हायरल केल्या जात आहेत.
 
यात 'प्रश्नम' नावाच्या, एका सर्व्हे करणाऱ्या संस्थेच्या रिपोर्टचा हवाला दिला जातोय. 'प्रश्नम'ने देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दल लोकांमध्ये एक सर्व्हे केला होता.
पण, देशातील मुख्यमंत्र्यांबद्दल सर्वेक्षण करणारी ही संस्था काय आहे? ही संस्था कोणाची आहे? याबद्दल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
काय आहे 'प्रश्नम'?
'प्रश्नम' काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही या संस्थेच्या वेबसाईटला भेट दिली. देशातील विविध राज्यांच्या मुंख्यमत्र्यांबद्दल सर्वेक्षण करणारी ही संस्था फार जुनी किंवा प्रसिद्ध नाही, असं दिसून आलं.
 
'प्रश्नम'च्या वेबसाईटवर, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने, लोकांकडून त्यांचं, खरं मत जाणून घेणारी ही पहिलीच संस्था असल्याचा दावा करण्यात आला आहे.
लोक काय विचार करतात? ग्राहकांचे विचार काय? महिला, युवा काय विचार करतात? यांची मतं ही संस्था जाणून घेणारी ही संस्था असल्याचं दिसून आलं.
 
ही संस्था काय करते?
'प्रश्नम'च्या वेबसाईटवर यूज केसेस नावाचा एक कॉलम देण्यात आला आहे.
 
ज्यात कॉरपोरेट कंपन्यांना ब्रॅंडबद्दल माहिती, मीडियाला प्रेक्षकांची मतं जाणून घ्यायची असली, राजकारण्यांना मतदार काय म्हणतात? निवडणूक कोण जिंकेल? अशा प्रकारचं सर्वेक्षण करण्याचं काम ही संस्था करते.
याचा अर्थ, कॉर्पोरेट कंपन्या, राजकारणी आणि इतरांसाठी लोकांकडून घेण्यात आलेल्या माहितीच्या आधारे सर्व्हे करून त्याचा अभ्यास करण्याचे काम ही संस्था करते.
 
ही संस्था कशी काम करते?
प्रश्नम संस्थेच्या वेबसाईटनुसार, सर्व्हेक्षणासाठी सॅम्पल (नमुने) रॅंडम पद्धतीने (यादृश्चिक) घेतले जातात.
 
फोन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने हजारो लोकांची मतं काही तासांमध्ये नोंदवण्यात येतात. जे काम करण्यासाठी इतरांना काही आठवडे लागतात ते काम काही तासांतच होतं असा या संस्थेचा दावा आहे.
 
ही संस्था कोणाची आहे?
'प्रश्नम'च्या वेबसाईटवर राजेश जैन या संस्थेचे संस्थापक, तर, चिराग पटनायक 'प्रॉडक्ट आणि टेक्निकल टीमचे प्रमुख असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
प्रश्नमच्या टेक्निकल मार्गदर्शक समुहात नामांकित शास्त्रज्ञ आणि सांख्यकीतज्ज्ञ असल्याचं सांगण्यात आलंय.
 
देशातील मुख्यमंत्र्याबद्दलचं सर्व्हेक्षण
प्रश्नमने, वेबसाईटवर देशातील मुख्यमंत्र्यांबद्दलच्या सर्व्हेक्षणाचे निष्कर्ष अपलोड केलेत.
 
मुख्यमंत्र्यांबाबतच्या सर्व्हेसाठी देशभरातून 17,576 लोकांची मतं नोंदवण्यात आली.
तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल काय वाटतं? त्यांच्या कामाबद्दल मत काय? काम चांगलं असेल तर पुन्हा व्होट करणार का? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
बिहार, गोवा, गुजरात, हरिणाया, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगाणा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड यांसारख्या 13 राज्यात सर्व्हे करण्यात आला.
महाराष्ट्रात 1108, पंजाबमध्ये 2405, उत्तरप्रदेशात 1140, मध्यप्रदेशमध्ये 1511, गुजरात 1390 आणि राजस्थानमध्ये 1561 लोकांना त्यांच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दल मतं विचारण्यात आली.
यात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काम चांगलं असल्याचं 49 टक्के लोकांनी, तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं काम चांगलं असल्याची पोचपावती 44 टक्के लोकांनी दिली.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह, यांचं काम सर्वांत खराब असल्याचं 60 टक्के लोकांचं मत आहे. असंच काहीसं मत, उत्तराखंडच्या भाजप मुख्यमंत्र्यांबद्दल व्यक्त करण्यात आलंय.
 
या सर्व्हेबद्दल संस्थापक काय म्हणतात?
देशातील मुख्यमंत्र्यांच्या या सर्व्हेबद्दल 'द प्रिंट'मध्ये प्रश्नमचे संस्थापक, राजेश जैन यांनी इतर राज्यांमध्ये सर्व्हेक्षण का करण्यात आलं नाही, याची माहिती दिलीये.
 
द प्रिंटमध्ये लिहिलेल्या आर्टिकलमध्ये ते सांगतात, "पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये सरकार स्थापन होऊन काहीच दिवस झालेत. त्यामुळे या राज्यांचा समावेश करण्यात आला नाही."
 
तर, आंध्रप्रेदश, छत्तीसगड, दिल्ली आणि हिमाचलप्रदेशमध्ये सर्व्हेक्षणासाठी पॅनल नसल्याने, या राज्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं नाही. पण, येत्या काळात या राज्यांनाही सर्वेक्षणात घेतलं जाईल अशी माहिती त्यांनी दिलीये.
 
असे सर्व्हे कशासाठी केले जातात?
सीएसडीएस (CDS) ही देशात राजकीय सर्व्हे करणारी अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेशी संबंधित प्रा. संजय कुमार यांना आम्ही, प्रश्नम आणि त्यांनी केलेल्या सर्व्हेबाबत विचारलं.
तेव्हा ते म्हणाले, "मी अशा कुठल्याही सर्व्हे करणाऱ्या संस्थेचं नाव कधी ऐकलेलं नाही. प्रश्नमच्या सर्व्हेत फक्त 2 प्रश्न विचारण्यात आले होते असं मी वाचलंय. आजकाल, होणाऱ्या सर्व्हेमध्ये खूप त्रूटी असतात."
 
"2 किंवा 3 प्रश्नांच्या आधारे निष्कर्ष काढणं योग्य नाही. सर्व्हेची क्वालिटी फारच निराशजनक असते. सर्व्हे कोणत्या पद्धतीने केला, याची पुरेशी माहिती सार्वजनिक करत नाहीत. सँपल साईज सांगत नाहीत. खूप फास्ट सर्व्हे केले जातात," असं प्रा. कुमार पुढे सांगतात.
 
सर्व्हेमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व योग्य प्रमाणात असलं पाहिजे. देशाच्या सर्व्हेच्या नावाखाली खूप छोट्या भागातल्या लोकांचं मत घेऊन ते देशांच्या लोकांचं मत आहे हे सांगितलं जातं. हे फार चुकीचं आहे, असंही संजय कुमार सांगतात.
 
मग हे असे सर्व्हे तयार का केले जातात? प्रा. संजय कुमार सांगतात, "सर्व्हेच्या माध्यमातून आकडे मिळतात. याचा वापर पुरावा म्हणून केला जातो. सरकारला त्यांनी केलेल्या कामाचा पुरावा विश्वसनीयरित्या द्यायचा असतो. त्यासाठी सर्व्हेच्या आकड्यांचा उपयोग होतो."
 
प्रा. कुमार यासाठी एक उदाहरण देतात. "महागाईचे आकडे किंवा बेरोजगारी दराचे आकडे लोकांमध्ये विश्वसनीयता आणि ओपिनिअन तयार करतात. मग आपली घटत असलेली लोकप्रियता सुधारण्यासाठी कधीकधी वेगवेगळ्या सर्व्हेंचा आधार घेतला जातो."
 
सर्व्हेबाबत प्रश्नमने काय म्हटलं आहे?
हा सर्व्हे कसा करण्यात आला याबद्दल बीबीसी मराठीने प्रश्नमचे संस्थापक राजेश जैन यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी माहिती दिली.
 
"सर्व्हेतील सर्व माहिती रॉ-डेटामध्ये देण्यात आली आहे. प्रश्नमकडून सर्व्हेतील संपूर्ण माहिती सार्वजनिक केली जाते."
 
"हा सर्व्हे इंटरॅक्टिव्ह व्हॅाइस रिस्पॅान्सने करण्यात आला होता. लोकांना ऑटोमॅटिक फोन कॅाल करण्यात आले होते."
 
प्रश्नम 2020 मध्ये सुरू करण्यात आलंय.
 
प्रश्मनने त्यांनी केलेल्या सर्व्हेच्या रॉ-डेटामध्ये किती महिला आणि पुरुषांनी या सर्व्हेमध्ये भाग घेतला याची माहिती दिली आहे. त्याचसोबत, त्यांच्या वयाची माहिती देण्यात आली आहे.
 
युवा, मध्यमवयीन वर्ग आणि कोणत्या शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला याची माहितीदेखील सार्वजनिक केली आहे, अशी माहिती राजेश जैन यांनी म्हटलं आहे.
 
प्रश्नमने याआधी केलेले सर्व्हे
 
प्रश्नमने याआधी, कोरोना काळात उत्तराखंडमध्ये आयोजित कुंभमेळाबद्दल लोकांमध्ये सर्व्हे केला होता.
 
कोरोनाविरोधी लशीबाबत लोकांमध्ये भीती होती. त्यामुळे लस न घेतलेल्या लोकांची मतं जाणून घेतली होती.
 
एकेकाळी कॉंग्रेसमध्ये असलेले नेते जतीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी, ज्या लोकसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं. त्याठिकाणचे मतदार काय म्हणतात याबाबत सर्व्हे केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती