महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती? नव्या सर्व्हेची जोरदार चर्चा
सोमवार, 19 जून 2023 (21:59 IST)
News Arena India या ट्वीटर हँडलने महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत कसे निकाल लागतील, याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील राजकीय समीकरण शिवसेनेतील फुटीनंतर पूर्णपणे बदललं आहे. या राजकीय घडामोडीचा आगामी निवडणुकीवर परिणाम होणार हे निश्चित आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आतापासूनच कंबर कसली आहे.
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी की शिवसेना-भाजप युतीचं पारडं जड याचा अंदाज आताच बांधणे थोडं घाईचं होईल. न्यूज एरिना इंडिया या संस्थेने केलेल्या सर्व्हेतून राज्यात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार असल्याचं समोर आलं आहे. तर विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अवघ्या 17 ते 19 जागांवर समाधान मानावं लागेल असा अंदाज आहे.
न्यूज एरिना इंडिया सर्वेक्षणात नेमकं काय?
न्यूज एरिना इंडिया सर्वेनुसार विधानसभा 2024 च्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा समोर येईल. यावेळी भाजपला आजवरच्या सर्वाधिक जागा जिंकण्यात यश मिळेल असाही अंदाज आहे. सर्व्हेनुसार, भाजपला 123-129 जागा, शिवसेनेला 25 जागा, राष्ट्रावादी काँग्रेसला 55-56 जागा, काँग्रेसला 50-53, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 17-19 जागा आणि इतर पक्षांना 12 जागा मिळतील असा अंदाज आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष म्हणून समोर येईल. भाजप, इतर आणि अपक्ष आमदारांची संख्या सुमारे 140 असेल म्हणून भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जागांमध्ये किरकोळ वाढ होईल. पण त्यांना बहुमताचा आकडा गाठणे शक्य होणार नाही. काँग्रेसला महाविकास आघाडीचा सर्वाधिक फायदा होईल, असाही अंदाज या सर्व्हेतून दिसत आहे.
हे ट्वीटर हँडल कुणाचं आहे किंवा त्यांनी कधी कुठे सर्वेक्षण केलं याची मेथडॉलॉजी या ट्वीटसोबत देण्यात आली नसली तरी, त्यांनी या सर्वेक्षणातील निष्कर्ष ही ट्वीटमध्येच प्रकाशित केले आहेत. त्यानुसार, आगामी निवडणुकीत भाजपला आजवरच्या सर्वाधिक जागा मिळतील असं भाकीत वर्तवण्यात आलंय. मतदानाची वेळ जसजशी जवळ येईल तोपर्यंत अपक्ष किंवा इतर उमेदवारांचा आकडा वाढू शकतो, असंही निरीक्षण या ट्वीटर हँडलने वर्तवलंय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळतील, तसंच त्या फक्त कोकणातच नाही तर सर्व महाराष्ट्रातून त्यांचे आमदार निवडून येतील असा निष्कर्षही न्यूज अरेना इंडिया या ट्वीटर हँडलच्या कथित सर्वेक्षणात काढण्यात आला आहे.
मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती?
न्यूज अरेनाच्या या कथित सर्वेक्षणानुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत कोणआला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी राज्यातील मतदारांची कोणाला सर्वाधिक पसंती आहे, याचीही माहिती या ट्वीटमध्ये देण्यात आलीय. त्यानुसार, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 35%, काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना 21%, सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना 14%, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 12%, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 9% मतदारांची पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे.