मालाड येथील दुर्घटनेला जबाबदार कोण? आ. विद्या चव्हाण यांचा सवाल

रात्री झालेल्या मुसळधार पावसात मुंबईतील मालाड भागात भिंत कोसळून सुमारे १८ जण मृत्युमुखी पडले तर कित्येक जण जखमी झाले आहेत. तसेच अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली. गेली २० वर्ष हा विभाग पालिकेच्या अखत्यारित येतो. मात्र, झोपड्पट्टीधारकांना कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. पाणी पुरवठा, वीज, पक्की घरे यापासून येथील झोपडीधारक वंचित असल्याचे विद्या चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
 
मुंबई महानगरपालिकेने वेळीच नाले, गटारे यांची व्यवस्था केली असती तर आज अशी दुर्दैवी वेळ ओढवली नसती. वन विभाग आणि पालिका यांच्यातच ताळमेळ नसल्याने पावसाळ्याआधी हाती घेतलेली कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पालिकेच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, एकीकडे मुंबईला स्मार्ट सिटी बनविण्याची स्वप्ने दाखवतात आणि दुसरीकडे ६५ लाख झोपड्पट्टीधारक अशा भीषण परिस्थितीत जीव धोक्यात घेऊन राहात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुर्घटना बाधित झोपड्पट्टीधारकांना घरे उपलबध करून द्यावीत आणि त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती