सरकारने सर्वसामान्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा टाकलाय - राष्ट्रवादीची टीका

मंगळवार, 2 जुलै 2019 (09:47 IST)
सर्वसामान्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा टाकणाऱ्या फडणवीस सरकारने कर्ज काढण्याचा विक्रमच केलाय, अशी उपहासात्मक टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानसभेत केली. तसेच फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना समान न्याय दिला जात नाही.एका मंत्र्यांला भरघोस निधी दिला जातो तर काहींना तुटपुंजा निधी दिला जातो, याकडे लक्षवेधीद्वारे शिंदे यांनी लक्ष वेधले.
 
विधानसभेत शशिकांत शिंदे यांनी सरकारला धारेवर धरताना सांगितले की, पुसेगाव-कोरेगावच्या एमआयडीसीचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. परंतू सरकार बदलले आणि या सरकारने तो निर्णय अडगळीत टाकला. याबाबत मंत्र्यांकडे पाठपुरावा केला तरी कारवाई होत नाही. त्यामुळे सरकारला एमआयडीसी करायची आहे की नाही, हे सरकारने स्पष्ट करावे, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
 
सरकारने अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली. पण प्रकल्प पूर्ण करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तसेच कामगार खाते राहिले आहे की नाही, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. सरकार भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करते मात्र कालातंराने त्यांना कामावरही घेतले जाते. त्यामुळे कुठे तरी सरकार या लोकांना पाठिशी घालत आहे. कामगाराला वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आहे. कामगाराला मोडीत काढण्याचे काम करू नका, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती