बापरे! तब्बल एक कोटी रुपयांची लाच स्वीकारतांना ‘हा’ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (20:19 IST)
येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला मोठे मासे लागले आहे. तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अहमदनगर उपविभागाच्या सहा. अभियंता (वर्ग 2) याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
 
अमित किशोर गायकवाड (वय 32 रा. प्लॉट नं 2 आनंदविहार नागापुर, अहमदनगर, मुळ रा. चिंचोली ता. राहुरी) असे त्या सहा.अभियंत्याचे नाव आहे. दरम्यान, त्याने सदरची लाच स्वतःसाठी व तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या करीता स्वीकारली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने काल ही कारवाई केली. या कारवाईबाबत रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदार यांनी अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत १०० एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे 2 कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल मिळावे म्हणून या बिलांवर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेवुन सदरचे देयक पाठविण्याच्या मोबदल्यात गायकवाडने स्वतःसाठी तसेच वाघ याच्या करीता या बिलाचे कामाचे व यापुर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणुन एक कोटी रूपये लाचेची मागणी केली. तशी तक्रार या ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

त्यानुसार नाशिक पथकाने काल दुपारी नगर – संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात आनंद सुपर मार्केट बिंल्डिंगच्या बाजुला सापळा लावला. त्यावेळी लाचेची एक कोटी रूपयांची रक्कम एका कार मध्ये गायकवाड स्विकारली. त्याचवेळी गायकवाडने त्याच्या मोबाईलवरुन वाघ याला फोन करून लाचेची रक्कमेबाबत माहिती दिली व त्याच्या हिस्स्याची 50 टक्के कोठे पोहचवावी बाबत विचारले असता वाघ याने सांगीतले की, ‘राहु दे तुझ्याकडे बोलतो मी तुला ते तुलाच पोहचवायचे आहे एका ठिकाणी, सांगतो नंतर सध्या तुझ्या सेफ कस्टडीमध्ये ठेवुन दे’, असे म्हणुन वाघ याने गायकवाड याच्या लाच मागणीस व स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाले आहे.
सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस नाईक किरण धुळे आणि पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी केली आहे.


Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती