अयोध्येतील विमानतळाचे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले. त्याचे स्वागतच आहे. आता त्याच धर्तीवर औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ आणि नवी मुंबईतील विमानतळाचे दि. बा.पाटील विमानतळ असे नामकरण करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
अयोध्येतील विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात आले. गोव्यातील मोपा येथील विमानतळाला गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आम्ही औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे तर नवी मुंबईतील विमानतळाला दी.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. तशी शिफारस केंद्राला करण्यात आली होती.
पण कोणत्या व्यक्तीच्या नावावरून नव्हे तर संबंधित शहराच्या नावावरून नाव देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सांगण्यात आले. पण आता ही दोन नावे व्यक्तींची देण्यात आली आहेत. हे पाहून आम्हाला आनंदच झाला. या दोन विमानतळांना लागू होणारे नियम महाराष्ट्रातील दोन विमानतळना लागू होतात का हे पाहण्याची आम्हाला उत्सुकता असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्राला गेल्या दशकभरात सातत्याने अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा लागला आहे. आतातरी या दोन विमानतळाच्या नामकरणाची प्रक्रिया वेगाने करावी अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.