आता खासदारांना कोणत्या शब्दाचा प्रयोग करणार, मनसेचा सवाल

बुधवार, 6 जुलै 2022 (14:57 IST)
मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. यावरुन खासदारसुद्धा भाजपच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. खासदार शिंदे गटात जातील अशी चर्चा सुरु आहे. राहुल शेवाळेंच्या पत्रामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावरुन मनसेकडून टीकास्त्र डागण्यात आले आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिवसेनेचे ४० आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आता १५ आमदार राहिले आहेत. यामधील काही आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. तर आता खासदारसुद्धा शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. आमदारांनी बंडखोरी केली तेव्हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रेडे, प्रेत अशा शब्दांचा वापर केला. यावरुन गजानन काळे म्हणाले की, आता यांचे खासदार पण म्हणतायेत आपण भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान करायला हवं. आधी रेडे,प्रेतं,घाण आणि आता सगळे खासदार सोडून गेल्यावर पिता-पुत्र आणि विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा? या विचारात असल्याची सूत्रांची माहिती, अशा शब्दात गजानन काळे यांनी टीका केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती