'बलात्कार प्रकरणात 2 महिन्यात फाशीची शिक्षा दिली', एकनाथ शिंदेंचा दावा खरा की खोटा?
सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (09:45 IST)
बदलापुरातील एका शाळेत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य ढवळून निघालं. याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे.
या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक दावा केला आहे.
रत्नागिरी येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी 'आम्ही तीन-चार महिन्यांपूर्वी घडलेले एक बलात्काराचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून दोनच महिन्यात आरोपीली फाशीची शिक्षा दिली' असं वक्तव्य केलं.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
रत्नागिरी येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
ते म्हणाले की, "बदलापूरच्या घटनेवरून विरोधक म्हणतात की, आम्हाला लाडकी बहीण नकोय तर सुरक्षित बहीण पाहिजे. तीन-चार महिन्यांपूर्वी अशीच एक घटना आमच्या बहिणीबरोबघर घडली होती. आम्ही ते प्रकरण जलदगती न्यायालयात चालवलं. चांगले वकील दिले, पुरावे दिले. पोलिसांनीही मेहनत घेतली आणि दोनच महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा दिली."
मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेलं फाशीच्या शिक्षेचं प्रकरण काय?
पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात ऑगस्ट 2022 मध्ये एका साडेसहा वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार करत तिचा खून करण्यात आला होता.
आरोपी हा पीडितेच्या घराशेजारीच राहत होता. त्यानं तिच्यावर अत्याचार करून घरामागील झुडपांमध्ये मृतदेह लपवला होता.
या प्रकरणातील आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी याला पुणे ग्रामीण पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली होती. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात आलं होतं.
याप्रकरणी 22 मार्च 2024 रोजी न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. तसंच आरोपीच्या आईलाही पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली 7 वर्षं सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
सध्या तो आरोपी कुठंय? शिक्षेचं पुढे काय झालं?
मुख्यमंत्री शिंदे यांनी रत्नागिरीच्या सभेत आरोपीला 2 महिन्यातच फाशीची शिक्षा दिल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात मात्र या प्रकरणात तब्बल 19 महिन्यांनी शिक्षा सुनावण्यात आली होती.
या प्रकरणातील आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली तरी त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
आरोपी तेजस हा पुण्याच्या येरवडा तुरुंगात कैद आहे.
या प्रकरणात पीडितेची बाजू मांडणारे सरकारी वकील अॅड. यशपाल पुरोहीत यांच्याशी बीबीसीने संवाद साधला.
ते म्हणाले, "जलदगती न्यायालयाने तेजस याला फाशीची आणि त्याच्या आईला 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. मात्र, तेजस दळवी याने या फाशीच्या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे."
विरोधकांची टीका आणि मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
बलात्कार प्रकरणात आरोपीला आम्ही 2 महिन्यात फाशीची शिक्षा सुनावली या वक्तव्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी टीका केली आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली ते जाहीर करावे, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे."
तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही एक्स या समाजमाध्यमावरून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल करत टीका केली आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री धडधडीत खोटं बोलत असून मागील दोन महिन्यात कोणत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली ते त्यांनी जाहीर करावे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर बलात्कारच काय इतरही कुठल्याच प्रकरणात शिक्षा झालेल्यांची त्यांनी नावे सांगावी.
"मुख्यमंत्री भर सभेत खोटं बोलून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. बलात्कारासारख्या प्रकरणात तरी न केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नका."
ते म्हणाले, "मी जे बोलतो ते सत्य बोलतो. सदर घटना ही मावळ तालुक्यातील कोथरूने गावातील असून या घटनेतील आरोपीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून पुणे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली."