मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावी सहकारी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रावसाहेब दानवे यांनाच टोमणा लगावला. रावसाहेब दानवे यांनाच शिवसेनेत यायचं असेल तर? असं म्हणत भुजबळांनी टोला लगावला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे मुख्यमंत्र्यांना त्रास होतोय या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याशी मी सहमत होऊ शकत नाही. कारण काँग्रेस, राष्ट्रवादीचा काहीही त्रास मुख्यमंत्र्यांना नाही. उलट मागील 5 वर्ष भाजपाने शिवसेनेला कशी वागणूक दिली सगळ्यांना माहित आहे. केंद्र सरकारमध्ये शिवसेनेला दिलेले मंत्रीपद आणि केलेली अवहेलनाही पाहिली, असं छगन भुजबळ म्हणाले.
सरकारमध्ये असून दिलेली वागणूक याचा लेखा जोखा मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे मला असं काही वाटत नाही. महाविकास आघाडीला धोका नाही, महाविकास आघाडीपासून इतरांना धोका असू शकेल, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.