मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं? – ग्राऊंड रिपोर्ट

सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (08:26 IST)
श्रीकांत बंगाळे
जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावातील मराठा आराक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन कव्हर करण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगरहून निघालो होतो.
 
1 सप्टेंबरच्या दुपारी या गावात पोलिस आणि आंदोलक यांच्या संघर्ष झाला होता. या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
 
2 सप्टेंबरच्या सकाळी जेव्हा मी संभाजीनगरहून अंतरवालीकडे निघालो, तेव्हा बदनापूर शहरात मोठा रस्ता रोको करण्यात आला होता. मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जविरोधात हा रास्ता रोको करण्यात आला होता.
 
शहरातल्या रस्त्यावरील मुख्य चौकात धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते. रस्त्याच्या एका बाजूनं गाड्यांची लांबच लांब रांग होती.
 
त्यामुळे मग पर्यायी मार्ग विचारत विचारत आम्ही गोकुळवाडी मार्गे जालन्याकडे निघालो.
 
जवळपास 2 तास आसपासच्या खेड्यांतून प्रवास करत शेवटी दुपारी सव्वा एकच्या सुमारास जालना शहरातल्या अंबड चौफुली इथं आम्ही पोहचले.
 
इथं काही वेळापूर्वी तरुणांनी दगडफेक केली होती. तसंच मोटारगाड्याही जाळण्यात आल्या होत्या.
 
रस्त्यावर दगडांचा आणि काचांचा खच पडलेला दिसत होता. अग्निशमन दलाचे कर्मचारी आग लागलेल्या गाड्या विझवत होते.
 
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी काही वेळापूर्वी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. तसंच प्लास्टिक बुलेटचे राऊंडही फायर करण्यात आले होते. या प्लास्टिक बुलेट रस्त्यावर पडलेल्या दिसत होत्या.
 
दरम्यान, 1 सप्टेंबर रोजी अंतरवाली गावात गावकऱ्यांसोबत झालेल्या झटापटीत काही पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.
 
त्यांच्यावर जालन्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली.
 
आम्ही रुग्णालयात पोहोचलो तर तिथं जवळपास 30 पोलिस कर्मचारी उपचार घेत असल्याचं दिसलं.
 
यातील काही महिला कर्मचारी होते. त्यांच्या कानाला, हाताला, डोक्याला दगड लागल्यामुळे जखम झाल्याचं आणि त्यावर मलमपट्टी केल्याचं दिसत होतं.
 
पूनम भट या जालना पोलिस मुख्यालयात हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कानाला जखम झाली आहे.
 
त्यादिवशी अंतरवाली गावात पोलिस बंदोबस्त होता आणि यात त्यांचा समावेश होता.
 
त्यादिवशी नेमकं काय घडलं, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, "आम्ही (मनोज जरांगे) पाटील यांना घ्यायला गेलो होतो. आम्ही तिथं उभं होतो. त्यावेळी सगळ्यांनी आम्हाला ढकलाढकली सुरू केली. ते आम्हाला खाली पाडत होते आणि खालून आमचे पाय धरत होते. यात जेंट्स होते.
 
"काहींनी आमचं शर्ट ओढलं, हाताला बोचकारलं. त्यानंतर आमच्यावर दगड आले. त्यानंतर मग आमच्या कर्मचाऱ्यांनी सौम्य लाठीमार केला. मला कानाखाली एक दगड लागलेला आहे. आमच्या महिला कर्मचाऱ्यांना खूप मार लागलेला आहे."
 
अंतरवाली गावात गेल्या आठवड्यापासून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे.
 
मनोज यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी पोलिस गावात पोहचल्याचं स्थानिक प्रशासन आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.
 
पोलिस गावात पोहचले तेव्हा तिथं काय परिस्थिती होती, यावर भट म्हणाल्या, “आम्ही तिथं गेलो तेव्हा रस्ता ब्लॉक होता. आम्हाला वाटलं त्यांनी सहज ट्रॅक्टर वगैरे लावलं असेल. पण नंतर जेव्हा आम्ही पळत होतो, तेव्हा आम्हाला पळायला जागा मिळत नव्हती. आम्ही इकडं-तिकडं लपत होतो आणि लोक आम्हाला गच्चीवरून दगडं मारत होते.”
 
दुपारी चारच्या सुमारास आम्ही अंतरवाली गावात पोहचलो. एव्हाना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आंदोलनस्थळी भेट देऊन गेले होते.
 
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्र सरकारचे मंत्री संदीपान भुमरे, अतुल सावे आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी अतंरवालीकडे निघाले होते. त्यांच्या मागे आमचीही गाडी होती.
 
तितक्यात गावापर्यंत येऊ द्या, असं म्हणत एक व्यक्ती आमच्या गाडीत बसली.
 
आंदोलन खूपच चिघळलं असं म्हटल्यावर ते म्हणाले, “हो. पण मला एक जण म्हणाला की, या माणसाचं (मनोज जरांगे) उपोषण सुरू आहे, तर मग हा दिवसभर माईकवर कसं काय बोलू शकतो?”
 
याच दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संभाजीनगरच्या फुलंब्रीमधील सरपंच मंगेश साबळे यांनी स्वत:ची कार पेटवून दिली. कार पेटवतानाचा व्हीडिओ त्यांनी सोशल मीडियावर टाकला.
 
या घटनेविषयी गाडीतील व्यक्ती म्हणाली, “अहो, गाडीला थोडासा स्क्रॅच लागला की माणसाचा जीव लागत नाही. यानं अख्खी गाडी पेटवून दिली. यातूनच याची कमाई कशी असेल ते कळतं.”
 
मंगेश यांच्या व्हीडिओखाली अनेकांनी त्यांच्या निषेध व्यक्त करण्याच्या मार्गाचं समर्थन करत त्यांना भावी आमदार असं म्हटलं आहे.
 
एव्हाना नेतेमंडळी व्यासपीठावर पोहोचली होती. मनोज जरांगे माईक हातात घेऊन उपस्थित समुदायाला मार्गदर्शन करत होते. समोरचं मैदान गच्च भरलेलं होते.
 
"आमचे पालकमंत्री (अतुल सावे) यांना मी आज पहिल्यांदाच बघितलं," असं मनोज जरांगे यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
 
यानंतर नेत्यांनी बोलण्यास सुरुवात केली. उपस्थित तरुणांनी आधी आरक्षण द्या, मग भाषणं करा, असं म्हणत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
 
काही वेळानं माझ्या शेजारी काही जण येऊन उभे राहिले. त्यातला एक म्हणाला, “लय हाणलं एका पत्रकाराला आज. कॅमेरा मोडून-तोडून टाकला त्याचा.”
 
त्याला प्रत्युत्तर देताना त्यांच्याच ग्रूपमधील दुसरा जण म्हणाला, “पत्रकाराला कशाला हाणलं रे. अशानं आपलं आंदोलन मोडून जाईल.”
 
गावावर लावण्यात आलेलं कलम 307 हटवू आणि गावकऱ्यांवर हल्ले करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करू, असं आश्वासन यावेळी संदीपान भुमरे यांनी दिलं.
 
ही नेतेमंडळी व्यासपीठाहून खाली उतरत असताना त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागणार असं दिसत होतं. तरुणांचे मोठे गट त्यांच्या गाड्यांशेजारी उभे राहून घोषणा देत होते.
 
शेवटी गावातीलच काही जणांनी या तरुणांना शांत राहण्यासाठी समजावलं आणि नेते गावातून बाहेर पडले.
 
संध्याकाळी साडेपाच वाजता आमची भेट मनोज जरांगे यांच्याशी झाली. व्यासपीठावर त्यांच्याशेजारी अनेक जणांनी गराडा घातला होता.
 
काही तरुण त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक होते. मनोज जरांगे पाटीलही त्यांना फोटो घेऊ देत होते. जरांगे यांच्या पांढऱ्या शर्टवर लाल डाग दिसत होते.
 
आंदोलनाविषयी विचारल्यावर जरांगे म्हणाले, “3 महिन्यात मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देऊ, असं सरकारनं आश्वासन दिलं होतं. 3 महिने उलटून गेले पण आरक्षणासाठीच्या समितीनं काही काम केलं नाही. आरक्षण घेईपर्यंत आम्ही हलणार नाही.”
 
1 सप्टेंबरला गावात काय घडलं, असं विचारल्यावर ते म्हणाले, “सरकारकडून आमच्यावर खूप मोठा हल्ला करण्यात आला. गोळीबार करण्यात आला. आमच्या गावातले खूप लोक त्यात जखमी झाले. आमच्या लोकांची डोकी फोडून त्यांना काय मिळालं माहिती नाही. आमचं आंदोलन ते मोडीत करायला निघाले, पण आज महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आमच्या पाठीशी उभा राहिलाय.”
 
पण, गावकऱ्यांनी दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं म्हटलं जात आहे, यावर जरांगे म्हणाले, “लोकांनी पोलिसांना हाणलं असं गृहमंत्री सांगत आहेत. पण पोलिसांनी आमचे लोक दांड्याखाली तुडवलेत.”
 
मराठा आरक्षणाचा अध्यादेश हवा, गावकऱ्यांवरील पोलिस केसेस माघारी घेतल्या पाहिजेत आणि गावात आलेले सगळे पोलिस कर्मचारी बडतर्फ केले पाहिजे, या 3 प्रमुख मागण्यांसह मराठा आरक्षणासाठीचं उपोषण सुरुच ठेवणार असल्याचंही जरांगे म्हणाले.
 
उपोषणस्थळी लावलेल्या खांबांवर कोपर्डीच्या नराधमांना तत्काळ फाशी द्या, मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, असे बोर्ड लावण्यात आले होते.
 
आंदोलनास्थळाहून बाहेर पडताना आमची भेट ललिता तारख यांच्याशी झाली. आम्ही त्यांच्या घरी पोहचलो तेव्हा त्यांनी गावात घडलेला घटनाक्रम सांगायला सुरुवात केली.
 
“आमच्या गावात संध्याकाळी हरिपाठ सुरू होता. हरिपाठ सुरू असतानाचा पोलिस लोक आहे. जवळपास 500 पोलिस लोक होते. ते आले आणि आम्हाला खेटू लागले. मनोज जरांगेंची तब्येत बिघडलीय, त्यांनी दोन थेंब पाणी घेणं गरजेचं आहे, असं पोलिस अधिकारी म्हणाले.
 
“मनोज भैय्यांनी त्यांच्या बोलण्यामुळे दोन थेंब पाणी घेतलं. पाचच मिनिटानंतर त्यांनी आम्हाला खालून लाठ्या मारायला सुरुवात केली. त्यांनी आमच्या गावातल्या 80-80 वर्षांच्या आजींच्या नळग्या फोडल्या. गावात गोळ्या झाडल्या. माझ्यासुद्धा पायाला गोळी लागलेली आहे,” ललिता सांगत होत्या.
 
“आमच्या गावातल्या महिलांना पोलिसांनी छातीमध्ये मारलं. पोलिसांनी त्यांच्याजवळचे दंडे आमच्या छातीमध्ये मारले. त्यांनी आम्हाला अशाठिकाणी मारलं की, आम्ही आमच्या अंगावरचा मार तुम्हाला दाखवू शकत नाही,” असंही ललिता पुढे म्हणाल्या.
 
अंतरवाली गावातून आम्ही निघालो तेव्हा रस्त्यावर काही तरुणांचा एक गट आम्हाला दिसला.
 
तुम्ही पत्रकार आहात का?, असं त्यांनी विचारल्यावर मी ‘हो’ म्हटलं.
 
त्यावर ते म्हणाले, “तिकडं कारखान्यावर जा पटकन. तिथं शरद पवारांच्या गाडीवर दगडफेक केली आहे.”
 
अंतरवाली गावाला भेट दिल्यानंतर जवळच असलेल्या अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार विश्रांतीसाठी थांबले होते.
 
पवार आंदोलनस्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्याविरोधात घोषणाही करण्यात आल्या. इतक्या वर्षांत तुम्ही काय केलं, असा सवालही काही तरुणांनी त्यांना भरसभेत विचारला.
 
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात सहभागी असलेल्या तरुणांचा मराठा नेत्यांविषयीचा रोष त्यांच्या वागण्यातून क्षणोक्षणी दिसत होता.
 
“तरुणांच्या भावना तीव्र आहेत ,राहणारच. पण तरुणांनी भविष्य धोक्यात आणू नये,” असं जालन्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी 3 सप्टेंबरला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
 
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानंतर शैलेश बलकवडे यांच्याकडे अधीक्षक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती