आता काय मोगलाई लागली का? अजित पवार यांचा केंद्र सरकारला सवाल

सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (20:31 IST)
देशातील शेतकरी आपल्याला मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. असे यापूर्वी कधीही घडले नाही. आता काय मोगलाई लागली का? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. अमरावती येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते. “केंद्र सरकार शेतकरीविरोधी भूमिका का घेत आहे हे कळायला मार्ग नाही, पण शेतकऱ्यांची अशी अडवणूक खपवून घेणार नाही,” असा इशारा देखील त्यांनी दिला.
 
“केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीचे अनुदान बंद केले. शेतकऱ्यांना मिळणारे दीड लाख रुपयांचे तसेच कंटेनरच्या भाड्याचे दोन लाख रुपयांचे अनुदान बंद केले. सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेताना दिसत आहे. आम्ही त्याचा निषेध केला आहे. शेतमालाला योग्य दर मिळावा आणि हमीभावापेक्षा कमी दर मिळत असेल, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, आपल्या मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक करण्याची सरकारची भूमिका आहे. राज्याच्या महाविकास आघाडीतील तीनही पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आणि विविध प्रश्नांवर शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्याचाच राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती