Floods and landslides in Maharashtra महाराष्ट्रात सतत पूर आणि दरडी कोसळण्यामागची कारणं काय आहेत?

गुरूवार, 20 जुलै 2023 (10:01 IST)
नितीन सुलताने
Reasons behind constant floods and landslides in Maharashtra राज्यात पुन्हा एकदा पावसानं थैमान घातलं आहे. अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
 
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी येथे आज दरड कोसळण्याची घटना घडली. गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात जोरदार पाऊस पडत होता.
 
पण हा प्रलयकारी पाऊस म्हणजे केवळ निसर्गाचा प्रकोप आहे की आपल्या चुकांचे दुष्परिणाम यावर चर्चा होणं गरजेचं आहे.
 
पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली किंवा शहरं, गावं पाण्याखाली गेली की 'पाऊस जरा जास्तच' झाला असं सहजच म्हटलं जातं. पण हे सगळं खरंच एवढं सोपं आहे का? हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे.
 
कोणतीही मोठी नैसर्गिक आपत्ती आली की, ग्लोबल वॉर्मिग, वातावरण बदल किंवा हवामान बदल हे शब्द वारंवार ऐकायला मिळतात. पण या सर्वामागं याशिवायही इतर कारणं असू शकतात का याचाही विचार व्हायला हवा.
 
त्यातही प्रामुख्यानं या सर्वात तुमचं आमचं काय चुकतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
 
हवामान बदल हेच मुख्य कारण?
हवमान बदलासंदर्भात बोलताना भारतीय हवामान खातं हे नेहमी सगळं काही ठीक आहे, म्हणजेच 'ऑल इज वेल' असल्याचं सांगतं. जगभरातल्या तज्ज्ञांचं मत मात्र वेगळं आहे, असं ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी म्हटलं आहे.
 
मात्र सध्या निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीमागं हवामान बदल हेच प्रमुख कारण असल्याचं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. जगभरातील हवामान तज्ज्ञांचंही तेच मत असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
पर्यावरण अभ्यासक विजय दिवाण यांनीदेखील हवामान बदलाचा मुद्दा हेच मुख्य कारण असल्याचं म्हटलं आहे.
 
''हे सर्व हवामान बदलामुळंच घडत आहे. त्यासाठी आपली बदलेली जीवनशैली, शहरीकरण हे कारणीभूत आहे यावर जगभरातील हवामान तज्ज्ञांचं एकमत झालं आहे,'' असंही विजय दिवाण यांनी म्हटलं.
 
पाऊस अनियमित बनला आहे. ऋतुमान विस्कटलं आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याचं गणित बिघडलं. त्यामुळं अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचे परिणाम वाढू लागले आहेत, असंही मत त्यांनी मांडलं.
 
आपण जगावेगळे कसे?
''वर्ल्ड मेट्रॉलॉजिकल ऑर्गनायझेशननं (जागतिक हवामान संघटना) 'वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन' नावाची संस्था सुरू केली आहे. ही संस्था घटनांचा कल पाहून निष्कर्ष काढते.
 
5 वर्षांपासून ते चक्रीवादळ, अतिवृष्टी पूर याचा अभ्यास करत आहेत. हे सर्व म्हणजे कार्बन उत्सर्जन वाढत असल्याचा परिणाम असल्याचं त्यांचं मत आहे," अशी माहिती देऊळगावकर यांनी दिली.
 
"या सर्वाचा विचार करता काही दिवसांपूर्वीची कॅनडातील किंवा अमेरिकेतील उष्णतेची लाट असेल वा जर्मनीतील पूर असेल. या सर्वामागं हवमान बदल हेच कारण आहे, असं शास्त्रज्ञ संगतात. मग आपल्याकडं जगावेगळं कसं असेल, त्यामुळं हवामान बदल होत आहे, हे नक्की" असं मत देऊळगावकर यांनी मांडलं.
 
'पाऊस तेवढाच पण कमी वेळात कोसळतो'
पूर, अतिवृष्टी अशा पावसाशी संबंधित नैसर्गिक संकटांमध्ये अनेकदा पावसाच्या लहरीपणावरही खापर फोडलं जातं. त्याशिवाय पावसाचा पॅटर्न बदलत चालला असल्याचीही चर्चा सध्या होत आहे.
 
अतुल देऊळगावकर यांनी पावसाच्या या लहरीपणामागचं कारणही सांगितलं.
 
''पाऊस हा जवळपास तेवढाच पडत आहे. पण तो कोसळण्याचा कालावधी कमी झालाय. म्हणजे पावसाचे तास हे पूर्वी 100 होते. तर ते आता 60-70 वर आलेत पुढं ते 50 पर्यंत जातील. याचा अर्थ म्हणजे आधी जेवढा पाऊस 100 तासांत पडत होता, तेवढाच पाऊस आता 60-70 तासांमध्येच पडतो. त्यामुळं त्याचा वेग आणि प्रमाण जास्त असतं.''
 
''साधारपणे पावसाचा एक थेंब 3 ते 5 मिलीमीटर व्यासाचा असतो. तो ताशी 30 ते 40 किमी वेगानं आकाशातून जमिनीवर पडतो. पण ढगफुटीदरम्यान किंवा अतिवृष्टीत या थेंबाचा व्यास वाढतो. त्याचा वेगही ताशी 100 किमी होतो. त्यामुळं 300-400 मिलीमीटर पाऊस पडतो,'' असं देऊळगावकर यांनी सांगितलं.
 
एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पावसाचा सामन करण्यासाठी मात्र आपल्याकडे पुरेशी यंत्रणाच नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
 
शहरीकरणाचा फटका, नियोजनाचा अभाव
शहरांचा विकास ओबड-धोबड पद्धतीनं झाला आहे. त्यामुळं पावसाचं पाणी वाहून जाण्याची पुरेशी सोय नसल्याचं पाहायला मिळतं, असं पर्यावरण अभ्यासक विजय दिवाण म्हणाले.
 
''पूर्वीच्या काळी नाले, ओढे, उतारानं पाणी वाहून जायचं. पण शहरात सिमेंटीकरणामुळं पाणी वाहून जाण्याची सोयच नाही. भूमिगत गटारांमधून केवळ घरांमध्ये वापरलेलं पाणी वाहून जातं. पावसाचं पाणी वाहून जायला जागा नाही, त्याचा परिणाम म्हणजे पाण्याची पातळी वाढत राहते," असं त्यांनी सांगितलं.
 
अशा समस्यांचा सामना करण्यासाठी शहरनियोजनासारखं काही अस्तित्वातच नसल्याचं अतुल देऊळगावकर यांनी म्हटलं आहे.
 
आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनीही तसंच मत व्यक्त केलं. ''अशा संकटाच्या दृष्टीनं विचार करता नगररचना किंवा शहर नियोजन हा महत्त्वाचा भाग आहेच. पण आपल्याकडे सगळी शहरं वसवलेली नाहीत, ही सर्वात मोठी अडचण आहे. गरजेनुसार आपली शहरं वाढत आहेत,'' असं ते म्हणाले.
 
नवी मुंबईसारख्या ठरवून वसवलेल्या शहरांमध्ये अशा समस्या कमी प्रमाणात पाहायला मिळतात. पण लोकसंख्या वाढीमुळं अनेक ठिकाणी शहरं आपोआप तयार होत जातात किंवा त्यांचा विस्तार होत असतो. वस्त्या निर्माण होतात आणि त्याठिकाणी हवी तशी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसते, असंही ते म्हणाले.
 
प्रशासन अधिक दोषी?
शहरं तयार होत असताना कशाचाही विचार न करता उभारलेल्या इमारती. सोयीसुविधांचा विचार न करता वस्त्या तयार करणं, यासाठी आपणही जबाबदार आहोतच. पण प्रशासन त्यासाठी अधिक दोषी असल्याचं प्रदीप देशपांडे सांगतात.
 
''नागरिकांपेक्षा प्रशासनाची जबाबदारी अधिक आहे. प्रशासनानं कठोरपणे अंमलबजावणी केल्यास लोक नक्कीच नियम पाळतात. प्रशासनानुसारच जनता वागत असते. पण त्यांचं याकडं लक्ष नसतं. इमारतींची परवानगी देताना, रस्ते तयार करताना कशाचाही गांभीर्यानं विचार केला जात नाही,'' असं देशपांडे म्हणाले.
 
अनेक ठिकाणी शहरांमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी (स्ट्रॉर्म वॉटर ड्रेन) योग्य सोय केलेली नसते. शहरांमधल्या छोट्या नद्यांचे ओढे होतात, त्या ओढ्यांचे नाले होतात आणि त्यावरही अतिक्रमण होत ते अखेर बंद होतात. मग पाणी कसं जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
ज्याठिकाणी ठरवून शहरं तयार केली तिथं अशा समस्या निर्माण होत नाहीत. कारण तिथं नियमांचं पालन होईल हे पाहिलं जातं. सगळीकडं तसं केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता देशपांडे यांनी व्यक्त केली.
 
यंत्रणेचा अभाव
या सर्वाची कारणमीमांसा करताना अपुरी यंत्रणा हा मोठा मुद्दा समोर आला. इमारतींचे मजले वाढत आहेत. शहरांचा उभा विस्तार होत आहे, पण त्या तुलनेत यंत्रणा उपलब्ध नाही आणि हीच मोठी अडचण आहे, असं प्रदीप देशपांडे म्हणाले.
 
वातावरणात प्रचंड बदल होत आहेत. त्यामुळं मोठ्या आपत्ती येत आहेत. पण त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारे सज्ज नसल्याची खंत, अतुल देऊळगावकर यांनी मांडली.
 
''आपल्याकडं कोणत्याही आपत्तीमुळं निर्माण होणारा धोका ओळखून बचावासाठी प्रयत्न होत नाहीत. आपत्तीच्या दृष्टीनं संवेदनशील भागाचा नकाशा तयार करावा लागतो. त्या माध्यमातून धोका कमी करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. पण आपल्याकडं तसं काहीही होत नाही,'' असा दावा त्यांनी केला.
 
"माळीण, उत्तराखंड अशा घटनांपासून धडा घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. पण तसं काहीच होत नाही, आणि त्याचा फटका बसत असतो. आपल्याकडे हवामानाचा विचार करून शहरं तयार केली जात नाहीत. विदेशामध्ये त्याकडं लक्ष दिलं जातं, परिणामी तिथं मोठ्या आपत्तींमध्येही 30-40 लोकांचाच मृत्यू होतो. आपल्याकडं मात्र हजारोंचा बळी जातो,'' असं देऊळगावकर म्हणाले.
 
समुद्राची पातळी ही चिंतेची बाब
पर्यावरण तज्ज्ञ विजय दिवाण यांनी या निमित्तानं आणखी एका मोठ्या धोक्याबाबत माहिती दिली.
 
''काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका आकडेवारीनुसार जगभरात समुद्राची पाणी पातळी वाढत आहे. मुंबईतही अरबी समुद्राची पातळी 7 इंचानं वाढल्याचं या आकडेवारीत समोर आलं होतं.
 
"पाणी पातळी वाढल्याचा परिणाम म्हणजे किनारपट्टीची पातळी खाली सरकत (खचत) आहे. या सर्वामुळं समुद्राचं पाणी अधिक प्रमाणात शहरात शिरतं. परिणामी किनारपट्टीला लागून असलेल्या भागाचा धोका वाढतो,'' असं दिवाण यांनी सांगितलं.
 
या सर्वाचा प्रत्यय आपल्याला पश्चिम किनारपट्टीवर दिसतोय. कोकण परिसरात अशा प्रकारे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. सध्या वाढलेलं पाणी दोन-चार दिवसांत ओसरूनही जाईल, पण यावर वेळीच योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर हा प्रकार जास्त वाढू शकतो. तसं झाल्यास गावंच्या गावं नष्ट होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
 
अतुल देऊळगावकर यांच्या मते, आपण ज्या पद्धतीचं वर्तन करत असतो, त्याचंच मोठं आणि अक्राळ विक्राळ रुप हे आपल्याला अशा संकटाच्या काळात पाहायला मिळतं. आपण चुकतच आहोत, त्यामुळं अशा घटनाही वारंवार घडणारच आहेत. पण अशा संकटांचा सामना करण्यासाठी आपण चुका कमी करणं आणि अधिक सज्ज असणं गरजेचं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती