विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह कृषी मंत्री धनंजय मुंडे, विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, हरिभाऊ बागडे, भास्कर जाधव, नाना पटोले, राणा जगजितसिंह पाटील, प्रकाश सोळंके, कैलास पाटील, राजेश टोपे, बालाजीराव कल्याणकर, अभिमन्यू पवार, संजय धोटे, ज्ञानराज चौगुले या सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले.
मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले त्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे कार्यक्रम मराठवाड्यात उत्साहाने साजरे केले जाणार असून यासाठी चार कोटी रुपये निधी देत आहोत तसेच जिल्हा नियोजनामधून प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये देत असल्याचेही सांगितले. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे एक अतिशय सुंदर असे स्मृती स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी १०० कोटी रुपये निधीला आम्ही मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.