विठुरायाचे दर्शन आज रात्री बारापासून पहाटे चारपर्यंत राहणार बंद; अशी होईल शासकीय महापूजा

गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (21:16 IST)
कार्तिकी एकादशीची महापूजा उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही पूजा करायचा मान मिळविणारे हे राज्यामधील पहिले दाम्पत्य ठरणार आहे. आज रात्री 12 वाजता विठुरायाच्या नित्यपूजेस सुरुवात होईल. यानंतर देवाची पाद्यपूजा केली जाईल. या पूजेवेळी रात्री 12 वाजेपासून पहाटे 4 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे.
दरम्यान, पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहकुटुंब मंदिरामध्ये दाखल होणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, मंत्री संदीपान भुमरे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार समाधान अवताडे, खासदार रणजित निंबाळकर उपस्थित असणार आहेत.
 
विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणीमातेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल्यावर पहाटे साडे तीन वाजता विठ्ठल सभामंडपामध्ये उपमुख्यमंत्री आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करणायत येणार आहे. त्यानंतर उद्या म्हणजेच कार्तिक शुद्ध एकादशीला पहाटे 4 वाजता राज्यभरामधून आलेल्या भाविकांसाठी दर्शनास सुरुवात होणार आहे.
मंदिराची आकर्षक सजावट 
कार्तिकी एकादशीच्या महासोहळ्यासाठी आज विठ्ठल मंदिरामध्ये 15 प्रकारच्या तब्बल 6 टन फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप, विठ्ठल सोळखांबी, महाद्वार, चौखांबी या ठिकाणी 15 कारागीर ही सजावट करत आहेत. या सजावटीचे सर्व पॅटर्न पुणे येथील 40 कारागिरांनी तयार केले आहे.
 
कार्तिकी यात्रेला वारकऱ्यांच्या संख्येत घट
राज्यभर झालेल्या परतीच्या पावसाचा फटका यंदाच्या कार्तिकी यात्रेला देखील बसला आहे. पावसामुळे वारकऱ्यांच्या संख्येत निम्म्याने घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. भाविकांच्या निवासासाठी प्रशासनाच्या 65 एकरावरील भक्तिसागर या निवासतळावरील निम्मे प्लॉट रिकामे पडले आहेत. यात्रा काळात कायम गजबजलेला हा भक्तिसागर यंदा मात्र मोकळा पडला आहे. राज्यभर यंदा परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर या नुकसानीचे पंचनामे अजून सुरूच असल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्याने यंदा कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरवली आहे. आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात अजूनही मोकळे रस्ते दिसून येत आहेत. ज्या भक्तिसागरमध्ये जवळपास 3 लाखापेक्षा जास्त भाविक दरवर्षी निवास करतात तिथे केवळ 1 लाख 68 हजार भाविकांच्या निवासाची नोंद झाली आहे. अजूनही जवळपास 180 प्लॉट मोकळे असल्याने या परिसरामध्ये यात्रेचे वातावरण देखील दिसत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती