ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे निधन

सोमवार, 3 जुलै 2017 (10:11 IST)
‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘चांदणे शिंपित जाशी’, ‘बेईमान’, ‘अखेरचा सवाल’, ‘चाफा बोलेना’, ‘संगीत मत्स्यगंधा’ अशा असंख्य नाटकांच्या माध्यमातून मराठी रंगभूमी गाजविलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे रविवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन कन्या असा परिवार आहे. मूत्रपिंडाच्या विकाराने ते काही काळापासून त्रस्त होते.
 
मराठी रंगभूमीवर ‘मामा’ म्हणून लोकप्रिय असलेले प्रा. तोरडमल यांचा ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकातील ‘प्राध्यापक बारटक्के’ नाट्यरसिकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिला. या नाटकाने रेकॉर्डब्रेक अशा पाच हजार प्रयोगांचा टप्पा गाठल्याने तोरडमलांचा ‘ह’च्या बाराखडीतला ‘प्रा. बारटक्के’ मराठी रंगभूमीच्या इतिहासात कायमचा अजरामर झाला. पुण्याच्या ‘बालगंधर्व’ नाट्यगृहात या नाटकाचे एकाच दिवशी तीन सलग प्रयोग झाले आणि या घटनेची रंगभूमीवर त्या काळी विशेष नोंद झाली. नाट्यसंपदा, नाट्यमंदार, गोवा हिंदू असोसिएशन, चंद्रलेखा अशा महत्त्वाच्या नाट्यसंस्थांतून प्रा. तोरडमल यांनी नाट्यसेवा केली. केवळ मराठी रंगभूमीच नव्हे; तर चित्रपटांतूनही त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. 

वेबदुनिया वर वाचा