तोपर्यंत गोड बाती येणार नाही : अजित पवार

सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (14:28 IST)
राष्ट्रवादीचे आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. या निवडणुकीत अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने फोडाफोडी होणार नाही. राज्यातील सत्तास्थापनेच्या दृष्टीने सोनिया गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीत आज (सोमवारी) भेट होणार आहे. त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल आणि सत्ता स्थापनेसाठी जोपर्यंत 145 च्या पुढे आकडा जात नाही, तोपर्यंत गोड बाती येणार नाही. त्यामुळे तोपर्यंत आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच राहावे लागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.
 
बारामती येथे एका कार्यक्रानंतर पवार यांना सत्तास्थापनेची गोड बाती केव्हा येणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. या निवडणुकीत अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने फोडाफोडी होणार नाही. काहींनी पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो हे सातार्‍यातील निकालावरुन सगळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे आता कुणी असे करणार नाही.
 
पवार पुढेम्हणाले, शेतकर्‍यांना दिलेली मदत अतिशय तुटपुंजी असून प्रत्यक्ष नुकसानपाहून मदत दिली पाहिजे. 
 
सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट असून त्यामुळे सगळे निर्णय केंद्रातून होत आहेत. या पार्श्वभूमीवर आमचे खासदार केंद्रात आवाज उठवून शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील, असेही ते यावेळी म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती