अॅड. रमेश खेमू राठोड (वय ३५, रा. शांती नगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भालचंद्र वनाजी नेमाडे (वय ६०, रा. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकात नेमाडे यांनी लमाण समाजाच्या महिलांबाबत आक्षेपार्ह लेखन केले आहे. लमाण समाजाच्या बायका पाण्यामध्ये माश्यासारखे नग्न पोहतात. लमाण समाजाच्या महिला हडप्पा काळापासून वेश्या व्यवसाय करतात. असे लिखाण केल्यामुळे जाती व समाजात द्वेषाची भावना निर्माण झाली आहे.
भालचंद्र नेमाडे यांची हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी सन २०१० साली प्रकाशित झाली. दरम्यानच्या काळात या कादंबरीवर अनेक आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. मात्र, त्यावर नेमाडे यांनीही आपली भूमिका सडेतोडपणे बजावली. या चर्चित कादंबरीसाठी नेमाडे यांना सन २०१५ मध्ये ज्ञानपीठ सन्मान जाहीर झाला आहे.