पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्याला नाशिक पोलिसांची अनोखी शिक्षा

बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (08:34 IST)
नाशिममध्ये ‘हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही’ असे आदेश देण्यात आले आहेत.यावरून अनेक पेट्रोल पंपवर ग्राहकांचे आणि पंप कर्मचाऱ्यांचे वाद होत असतात.असाच काहीसा प्रकार दिंडोरी रोड येथील इच्छामणी पेट्रोल पंपावर घडला.चौघांनी हेल्मेट घातले नाही म्हणून पेट्रोल न देण्याच्या वादातून पंप कर्मचाऱ्यास मारहाण केली होती.या संशयितांना म्हसरूळ पोलिसांनी सात दिवसांची अनोखी शिक्षा केली आहे.
 
नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून ‘नो हेल्मेट,नो पेट्रोल’ अशी मोहीम सुरू केली आहे .दिंडोरी रोडवरील इच्छामणी पेट्रोलपंपावर बुधवारी (ता.१८) रोजी सायंकाळी चौघा संशयितांनी येथील कर्मचारी ज्ञानेश्वर पोपट गायकवाड यांच्याकडे पेट्रोल मागितले.तेव्हा ज्ञानेश्वर पोपट गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार हेल्मेट नसल्याने त्यांना पेट्रोल देण्यास नकार दिला.
 
पंप कर्मचारी व संशयितांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसन थेट हाणामारीत झाले होते.या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयितांना अटक करण्यात आली होती.या संशयिताना नाशिक पोलिसांनी सात दिवसांची अनोखी शिक्षा दिली आहे.
 
या चौघांना पेट्रोल पंपावर हेल्मेट परिधान न करता येणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रबोधन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सोमवारी ता. २० पासून या अनोख्या शिक्षेचा प्रारंभ करण्यात आला असून पुढील सात दिवस संशयित जनजागृतीचे फलक घेऊन पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांचे प्रबोधन करणार आहे .

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती