केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना, खळबळजनक विधान केल्यानंतर आता राज्यभर पडसाद उमटत आहेत.त्यानंतर आता विविध स्तरावरुन प्रतिक्रिया येत आहेत. दिल्लीत खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित नारायण राणेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.तर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे.केंद्रीय मंत्री असा की बादशाहा असा कारवाई होणारचं अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
“कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री हे फक्त एक व्यक्ती नसून ती संस्थाअसते.त्यांना संविधानिक दर्जा असतो.तुम्ही राजकीय टीका करा पण ज्याप्रकारे नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात नारायण राणेंसारखी लोकं आहेत जे मुख्यमंत्र्यांना मारेन असे वक्तव्य करतात. ही काय भाषा आहे.हे भाजपाचे संस्कार आहेत? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कोणती भाजपा उभी केली आहे? यावर कायदा आपले काम करेल.तुम्ही मंत्रीमंडळातील मंत्री असाल किंवा बादशहा असाल आम्हाला काही फरक पडत नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“धमकीच्या भाषेचा वापर आपण केला आहे. काल पर्यंत २५ वर्षे आमच्यासोबतच काम केलं आहे.तुम्ही दुसरीकडे गेलात हे ठीक आहे पण ज्या शाळेतून तुम्ही बाहेर पडलात ना ती शाळा अजूनही सुरु आहे.तुमच्या सारखे खूप लोकं आहेत. तुम्हाला कोण विचारतं. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिवसेनेवर हल्ला करायचा हेच तुमचं काम आहे. जेव्हा आमचा बाण सुटेल तेव्हा काय होईल ते पाहा,”असे संजय राऊत यांनी सांगितले.