उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 'सामना'ला मुलाखत देणं पॉलिटिकली करेक्ट?

"उद्धव ठाकरे यांच्या आपण आजवर अनेक मुलाखती घेतल्या, पाहिल्या आणि वाचल्या. पण उद्धव ठाकरे यांच्याशी आपण आतापर्यंत बोलत होतो शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून, या देशातले प्रमुख राजकीय नेते म्हणून. पण आज आपण त्यांच्याशी बोलतोय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून."
 
'सामना'चे संपादक संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची मुलाखत सुरू करताना पहिल्या काही सेकंदात म्हणतात. या मुलाखतीचा पहिला भाग 3 फेब्रुवारी रोजी प्रसारित आणि प्रकाशित झाला, तर उर्विरत दोन भाग आज आणि उद्या येणार आहेत.
 
मुख्यमंत्री झाल्यापासून ही त्यांची पहिलीच मुलाखत म्हणावी लागेल. तीसुद्धा त्यांनी एका पक्षाच्या, त्यांच्याच पक्षाच्या मुखपत्राला मुलाखत दिली, आणि ती त्यांच्याच पक्षाचे खासदार असलेले संजय राऊत यांनी घेतली.
 
मुख्यमंत्री ठाकरे यांनी नक्कीच यात अनेक बाबींवर भाष्यही केलं, मात्र अडचणीचे ठरू शकणाऱ्या अनेक प्रश्नांचा 'सामना' त्यांना करण्याची वेळच आली नाही.
 
यामुळे एका वेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे - ही मुलाखत कितपत मनमोकळी आणि खरी म्हणावी? त्यातून एक पक्षनेते बोलतायत की एक मुख्यमंत्री? असे प्रश्न पडणं स्वाभाविक.
 
'ठाकरेंनी आता सर्वसमावेशक दृष्टिकोन अनुसरायला हवा'
बाळासाहेब ठाकरेंच्याही काळात अशाच मुलाखती व्हायच्या, संजय राऊतच त्या घ्यायचे. याचं कारण ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, "सामनामधली मुलाखत शिवसैनिकांसाठी एखाद्या सनदेप्रमाणे आहे. या मुलाखतीत जे बोललं जातं, त्यानुसार शिवसैनिक प्रतिक्रिया देतात, आपली भूमिका ठरवतात. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'लाच मुलाखत दिली असं यांनी सांगितलं.
 
"शिवसेना भाजपबरोबर सत्तेत असतानाही उद्धव ठाकरे सामनाला मुलाखती द्यायचे. तीच प्रथा त्यांनी कायम ठेवली. मात्र आता ते फक्त पक्षप्रमुख राहिलेले नाहीत, ते आता राज्याचे प्रमुख आहेत. त्यांची भूमिका 'सामना' वाचूनच कळेल, अशी संभ्रमावस्था राहायला नको, तशा आशयाच्या शंका-कुशंका निर्माण व्हायला नकोत.
 
उद्धव ठाकरे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे आहेत, आता त्यांनी सर्वसमावेशक दृष्टिकोन अनुसरायला हवा, असं त्या म्हणाल्या.
 
त्या पुढे म्हणाल्या, "सह्याद्री वाहिनी, योजना मासिक किंवा जय महाराष्ट्र कार्यक्रमात त्यांची मुलाखत होऊ शकते, परंतु तिथे उद्धव ठाकरे यांना भाजप, राजकीय खेळी याबद्दल विचारता येईलच असं नाही. कारण सरकारी यंत्रणा रिजिड असते. तिथे धोरणात्मक प्रश्न विचारले जाऊ शकतात.
 
"पत्रकार परिषदांमध्ये धोरणात्मक निर्णयांविषयी ते माहिती देतात. 'सामना'व्यतिरिक्त वर्तमानपत्रं, वाहिन्या, संकेतस्थळं यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी 'सामना'लाच मुलाखत दिली असेल, असं वाटत नाही. पण तसं होणार असेल तर ते चुकीचं आहे," असंही राही भिडे म्हणाल्या.
 
पक्षप्रमुख म्हणून मुलाखत, उत्तरं मुख्यमंत्री म्हणून
याविषयी आम्ही 'सामना'चे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही. त्याशिवाय शिवसेनेच्या काही नेत्यांना गाठण्याचा प्रयत्नही केला असता, कुणी यावर बोलणं टाळलं तर कुणी उपलब्ध झाले नाही. (त्यांची प्रतिक्रिया आल्यास इथे नक्कीच अपडेट केली जाईल.)
 
दरम्यान, "शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने 'सामना'ला मुलाखत दिली, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. मात्र या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तरं दिली," असं मत 'लोकसत्ता'चे राजकीय संपादक संतोष प्रधान यांनी व्यक्त केलं.
 
"'सामना'ला मुलाखत देण्यामागे काही कारणं आहेत. अन्य कोणत्याही प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली तर अवघड आणि अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो. सामनाच्या बाबतीत तो धोका नाही. 'सामना' हे शिवसेनेचं मुखपत्र असल्याने मुलाखतीसाठी सामनाचीच निवड करण्यात आली", असं ते म्हणाले.
 
ते पुढे सांगतात, "पूर्वी पत्रकार टोकदारपणे प्रश्न विचारायचे. पत्रकारांचा राजकारण्यांवर काहीसा धाक असायचा. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. यात माध्यमांचीही चूक आहे. माध्यमांनी आपलं काम चोख केलं तर राजकारण्यांवर वचक राहू शकतो. पण आता प्रत्येकजण प्रसिद्धी कशी मिळेल म्हणजेच झळकायला कसं मिळेल, या विचारात असतो. अवघड प्रश्न टाळले जातात."
 
"गेल्या तीन-चार वर्षात राजकारण्यांचा प्रसारमाध्यमांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पूर्वी प्रिंट फॉरमॅटचा म्हणजेच वर्तमानपत्रांचा विचार करून पत्रकार परिषदा घेतल्या जायच्या. मात्र आता इलेक्ट्रॉनिक चॅनेल्सच्या स्लॉटनुसार पत्रकार परिषदेच्या वेळा निश्चित होतात. चॅनेल्सवर दुपारच्या सत्रात प्रायोजित कार्यक्रम असतात. त्यामुळे चॅनेलवर बातमी त्वरित घेतली जाईल, अशा उद्देशाने कार्यक्रम आयोजित केले जातात," असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं
 
संजय राऊत यांची भूमिका प्रामाणिक
दिल्लीस्थित 'न्यूजलाँड्री' या माध्यमांची समीक्षा करणाऱ्या मीडिया कंपनीचे सहसंस्थापक अभिनंदन सेखरी यांनी बीबीसी मराठीशी यावर चर्चा केली.
 
"'सामना' हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. एका मुखपत्राचं कामच असतं आपल्या पक्षाची भूमिका समाजात मांडणं. सर्वोत्तम पत्रकारिता करणं, हे काही त्यांचं उद्दिष्ट नसतं. त्यामुळे किमान आपण हे म्हणू शकतो की संजय राऊत आणि 'सामना' जे काही करत आहेत, ते अगदी प्रामाणिकपणे करत आहेत," असं ते म्हणाले.
 
"एका मुखपत्राशी बोलणं ही परंपरा अनोखी आहे. मी तरी अशी पद्धत इतर कुठे पाहिलेली नाही," असं NDTVचे ज्येष्ठ पत्रकार मनोरंजन भारती सांगतात.
 
"हल्ली राजकीय नेते मुलाखतीत त्यांना हवं ते बोलतात. प्रश्नांची उत्तर देतच नाहीत. त्यांना प्रश्न विचारलेले चालत नाहीत. मात्र मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख नेत्याने आपल्याच वर्तमानपत्राला मुलाखत देणं आणि मुलाखत घेणारे राज्यसभा खासदार असणं, असं उदाहरण दुर्मिळच असेल. असं दुसरं उदाहरण मला तरी आठवत नाही", असं त्यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले, "मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पत्रकारांशी संवाद साधायचे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी काही पत्रकारांना मुलाखती देतात. मात्र केवळ एकाच वर्तमानपत्राला (जो त्यांच्याच पक्षाचा आहे) मुलाखत दिल्याचं स्मरत नाही.
 
"माध्यमं घाबरलेली आहेत. माध्यमं कमुकवत होत आहेत. मनमोहन सिंग सरकारच्या काळात पत्रकार परिषदेत कोणताही प्रश्न विचारता यायचा. आता प्रश्न ठरलेले असतात. ठराविक चॅनेल्स, ठराविक पत्रकारांनाच मुलाखती दिल्या जातात. त्यातूनच तुम्हाला आंबे आवडायचे का, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. यामुळे माध्यमांची विश्वासार्हता घटली आहे. 'गोदी मोडिया' संकल्पना यातूनच निर्माण झाली आहे," असं ते सांगतात.
 
संजय राऊत-उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीची तुलना मोदी-शाहांच्या अशा मुलाखतींशी करता येईल का, असं विचारलं असता 'न्यूजलाँड्री'चे अभिनंदन सेखरी म्हणाले, "खरं तर ही तुलना योग्य नाहीच. कारण ही काही माध्यमं म्हणतात की आम्ही पत्रकारिता करतोय, मात्र ते जे करत आहेत, त्यामुळे पत्रकार आणि पत्रकारितेचं नुकसानच होतंय. त्यामुळे ते आपल्या कामात प्रामाणिक आहेत, असं आपण म्हणूही शकत नाही. उलट 'सामना' आणि संजय राऊत आपली भूमिका चोखपणे बजावत आहेत."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती