जनसंवाद यात्रेनिमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज धाराशिव लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांशी, जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 2002 साली तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींना वाचवलं. बाळासाहेब ठाकरे नसते तर आज मोदी कुठे असते? असा सवाल करत शिवसेना फोडणाऱ्यांना शिवसैनिक मातीत गाडल्याशिवाय राहाणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ओम राजेनिंबाळकर खासदार आहेत. खासदार ओम राजेनिंबाळकर म्हणाले की, जे आज म्हणत आहे की शिवसेनेचे खासदार नरेंद्र मोदींमुळे निवडून आले. त्यांना आठवण करुन देतो की मोदींचा राजकीय जन्मही झाला नव्हता तेव्हापासून धाराशिवमध्ये शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे. या मतदारसंघाने मोदींच्या आधी तीनवेळा शिवसेनेचा खासदार निवडून दिला आहे. या जनसंवाद यात्रेत खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
– भाजपा नेत्यांना वाटले होते की आमदार, खासदार फोडले म्हणजे शिवसेना फुटेल. पण शिवसेना अशी फुटणार नाही. शिवसैनिक तुम्हाला गाडून, मुठमाती देऊनच थांबणार.
– मणिपूरमध्ये शेपूट घालणारा गृहमंत्री आमच्यावर बोलून गेला.
– ज्यावेळी मोदी नाव कोणाला माहित नव्हते, तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो.
– बाळासाहेब ठाकरे नसते तर मोदी कुठे असते. अटलबिहारी वाजपेयींनी मोदींना केचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मोदींना वाचवले. तेव्हा वाचवले नसते तर मोदी कुठे असते?
– महायुती सरकारच्या ट्रिपल इंजिनला भ्रष्टाचाराची चाकं.
– याचं हिंदूत्व आणि आमचं हिंदूत्व वेगळं आहे.
– आता त्यांनी सुरु केलं आहे की १४० कोटी लोक माझा परिवार आहे.
– मी मुख्यमंत्री असताना म्हटलं होतं, माझे कुटुंब, माझी जबाबदारी. मोदींनी अर्धच घेतलं. माझा परिवार, पण या परिवाराची जबादारी कोण घेणार?