उद्धव ठाकरेंच्या भाषणात निराशाच दिसून आली: देवेंद्र फडणवीस
गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (14:44 IST)
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे नेस्को येथे गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अमित शहा आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
तिन्ही पक्ष एकत्र येऊन मला संपवू शकत नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणात फक्त निराशाच दिसून येत होती असंही ते म्हणाले आहेत.
जेव्हा आमच्या पाठीत खंजिर खुपसला तेव्हा राजीनामे देऊन का निवडणुका घेतल्या नाहीत, हिंमत होती तर तेव्हा राजीनामे देऊन निवडणुका घ्यायला हव्या होत्या असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांची हे शेवटची निवडणूक असं उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारताच फडणवीस म्हणाले, 'त्यांनी 2.5 वर्षं मला संपवण्याचा प्रयत्न केला पण संपवू शकले नाहीत, यापुढेही संपवू शकणार नाहीत.'
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
आज हे एवढं आहे. दसऱ्याला किती असेल. दसरा शिवतीर्थावरच घेणार.
व्यासपीठावर संजय राऊत नेटाने लढतो आहे. संजय राऊत यांची रिकामी खुर्ची पाहीली. संजय राऊत हे मिंधे गटात गेले असा समज नको म्हणून सांगतो, संजय राऊत हे मोडेन पण वाकणार नाही.
आज व्यासपीठावर आल्यावर पाहीलं आमचे वडील आहेत ना जागेवर? मुलं पळवणारी टोळी ऐकली होती. पण वडील पळवणारी औलाद आजच पाहिली.
आम्ही छत्रपतींचा इतिहास वाचत मोठे झालो आहे. स्वराज्यावर शहा चालून आले होते. मध्ये येऊन गेले होते. त्याच कुळातले शहा, म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवा, त्यांना माहिती नाही ही गवताची नाही तलवारीची पाती आहे.
आज निवडणूक आल्यानंतर मुंबई दिसते. संकट आल्यावर तुम्ही कुठे असता?
मुंबई आमची आई आहे, जो आमच्या आईवर वार करायला येईल त्याचा कोथळा काढला जाईल. आईला गिळायला निघालेली औलाद आहेतच काय लोकं आहेत ही.
कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय? कमळाबाई शब्द बाळासाहेबांचा आहे. मुंबईवर हक्क सांगण्याचं धाडस करू नका.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिल्या पाच अग्रणी नेत्यांमध्ये माझे आजोबा होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा जनसंघाने समिती फोडली. ही त्यांची औलाद.
ही नालायक माणसं आपण जोपासली. मेहनत आम्ही करायची, कारण काय तर राष्ट्रीय पक्ष. वरती पोहोचल्यावर आम्हाला लाथा मारायला लागल्या?
एवढे उपरे घेतलेत की बावनकुळे की एकशेबावन्न कुळे हेच कळत नाही.
चित्ता आणला... काय त्याचे फोटो... खरंतर फोटोग्राफी हा माझा विषय आहे. पण मी कधी पेन्ग्विनचे फोटो नाही काढले? हो आम्ही आणले पेन्ग्विन... अभिमान आहे आम्हाला.
वेदांत गुजरातला गेला. त्याबद्दल धादांत खोटं बोलतायेत. कोणामुळे का गेला असेना... मी येतो तुमच्यासोबत आणा तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी एकत्र येऊ. प्रकल्प परत आणू. मिंधे गट फक्त होय महाराजा म्हणतोय. आजही गेले आहेत दिल्लीत मुजरा मारायला. किती मुजरे केले असतील. हा प्रकल्प महाराष्ट्रात का नाही आला? हिंमत असेल तर विचारा पंतप्रधानांना.
वरळी डेअरीच्या तिथे मत्स्यालय झालं पाहिजे. वरळीत घरं बांधा. आर्थिक केंद्र असलेल्या शहरातून आपल्या राज्यात पळवता?
शिवसेना म्हणजे विश्वास आहे, शिवसेना म्हणजे आधार आहे. पहिले धावत कोण गेलं आहे? प्रत्येक वेळेला धावत तेच जातात.
उद्धव ठाकरे एक पत्र घेऊन आले. ते NSG चं पत्र आहे. 26/11 च्या हल्ल्यात नरिमन हाऊसची धुमश्चक्री चालू असताना शिवसेनेने त्यांना जेवण दिलं. चार सैनिक जखमी झाले. अतिरेक्यांबरोबर ते लढत होते.
मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर इतकी गर्दी जमवावी. तुमच्या आशीर्वादाची शक्ती घेऊन मी लढायला निघालो आहे.
जे बोलतो ते करतो. जे केलं आहे की नाही ते घरी जाऊन सांगावं लागेल. 550 स्क्वे. फूटपर्यंतचा मालमत्ता कर रद्द केला आहे.
मुंबई महापालिका शाळांमध्ये अॅडमिशन घ्यायला आता रांगा लागतात.
ते तुमचे कोश्यारी मला पत्र लिहिलं होतं की तुम्हाला काही ईश्वरी संकेत मिळतात का? तेव्हा आपण हॉस्पिटल उघडले होते.
कोरोना काळात अनेकदा दिल्लीवरून दबाव येत होते. पण आम्ही ते केलं नाही.
कोव्हीडमध्ये मुंबईचं कौतुक परदेशी लोकांनी केलं. न्यूयॉर्क टाईम्सने मुंबई मॉडेलची बातमी दिली. त्यांना कौतुक आहे. पण कमळाबाईला त्याचं काही नाही.
आमच्याकडे असणार्या खासदार बाईंवर आरोप केले आणि तुमच्याकडे आल्यावर सगळ्या महिलांमध्ये तीच बाई तुम्हाला राखी बांधायला मिळाली?
भाजपने माणसं धुवायची लाँड्री काढलीय का?
देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही हे सांगणारा निकाल येत्या काही दिवसात लागणार आहे.
कोणालाच माहिती नाही कसा कारभार चालू आहे.
आपल्या विरोधकांना आपली ताकद कळली आहे. मुन्नाभाई सोबत घेतला आहे. ठाकरे कुटुंब संपवा, हे माझं कुटुंब आहे (गर्दीकडे बोट दाखवत), संपवा त्यांना.
हे सरकार फिरतं सरकार आहे. फिरण्याची सवयच लागली आहे. सुरत, गुवाहाटी, दिल्ली...
आपल्या आयुष्यातली ही पहीलीच निवडणूक आहे असं समजून कामाला लागा. आता आपल्याकडे काहीच नाही असं समजा आणि कामाला लागा.
ढीगभर गद्दार सोबत असण्यापेक्षा मूठभर निष्ठावान शिवसैनिक सोबत असणं चांगलं.
खळाळता झरा पुन्हा कामाला लागली आहे. शिवसेना म्हणजे हिम्मत, विकास.
मुंबई महापालिका लढण्यासाठी पंतप्रधान येत आहे. पण मर्द अशा लढाईची वाट पाहतोय, आम्ही मर्द आहोत.
आज मुस्लिम लोक सुध्दा शिवसेनेसोबत आहेत.
काही काळ संघर्षाच्या वाटेवर जाण्याची तयार आहे का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना विचारला.
अमित शहांना आव्हान देतो की तुमचे कोणतेही डावपेच यशस्वी होणार नाही.
आज हिंदू मुस्लीम आमच्याबरोबर आहे. आमच्याबरोबर सगळे आहेत कारण कोरोना काळात मी सगळ्यांचे प्राण वाचवले आहेत.
तुमची शहानिति यशस्वी होणार नाही. अमित शहांना आव्हान आहे की महिनाभरात निवडणूक घेऊन दाखवा, कुस्ती आम्हाला पण येते. हिम्मत असेल तर या समोर. आजपासून तुम्ही पण जागे रहा (गटप्रमुखांना)