मला महाराज म्हणू नका; ते फक्त एकच : उदयनराजे

सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (11:46 IST)
महाराज फक्त एकच होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी आपण सगळे छाटछूट आहोत. त्यामुळे यापुढे कुणीही मला महाराज म्हणू  नका, असे आवाहन सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
 
सातार्‍यात छत्रपती शिवाजीराजे भोसले संग्रहालयाच्या सुरू असलेल्या बांधकामाची खासदार उदयनराजे यांनी नुकतीच पाहणी केली. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या या संग्रहालयाचे बांधकाम निधीअभावी बंद पडले होते. यावर तोडगा काढण्यासाठी उदयनराजेंनी पुरातत्त्व खाते, सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व संबंधित अधिकार्‍यांना बोलावून घेतले व त्यांना काही सूचना केल्या. अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी आपल्या खास स्टाइलने संवाद साधला.
 
सर्वसामान्यांसह अनेक अधिकारीही उदयनराजेंना 'महाराज' म्हणून संबोधतात. त्याबद्दल उदयनराजेंनी यावेळी नाराजी व्यक्त केली. मला कुणीही महाराज म्हणू  नये, असे ते म्हणाले. अरबी सुद्रात शिवस्मारक होणे केवळ अशक्य आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलीकडेच एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्याबद्दलही उदयनराजे यांनी रोकठोक मत मांडले. राज ठाकरे कोणत्यासंदर्भात म्हणाले ते मला माहीत नाही. पण, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होऊ शकतो, तर शिवस्मारक का होऊ शकत नाही? आपण सगळे शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळे जगत आहोत. शिवाजी महाराज हे एक वेगळ्या उंचीचे व्यक्तिमत्तव होते. जगात अनेक राजे होऊनगेले, पण जाती-धर्मापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांनी जे केले, ते कुणाला जमले नाही. छोट्याशा आयुष्यात तीनशे-साडेतीनशे किल्ले बांधण्याची अशक्यप्राय गोष्ट त्यांनी करून दाखवली. हा एकच राजा असा आहे, ज्याला लोकांनी देव्हार्‍यात स्थान दिले आहे. त्यांच्यासाठी आपण एक स्मारक उभे करू शकत नाही. हा केवळ बुद्धीने नव्हे तर हृदयापासून विचार करण्याचा मुद्दा आहे, असे ते म्हणाले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती