तिवरे धरण दुर्घटना: मदत कार्य सुरु, चौकशी होणार

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण अतिवृष्टीमुळे फुटलं आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 24 जण बेपत्ता झाले असून दुर्घटनेतील 7 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळाली आहे. 
 
तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. लीकेज असताना स्थानिकांना तक्रार दिली गेली होती. आता या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणार असे गिरीश महाजन म्हणाले. 
 
ताज्या माहितीनुसार घटनेतील 7 जणांचा मृतदेह हाती लागला आहे. नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून काठच्या गावकऱ्यांनाही धोक्याचा इशारा दिला गेला आहे. 
 
धरण 2012 साली बांधून पूर्ण झाले. 2.452 दशलक्ष घनमीटर इतकी त्याची पाणी साठवणुकीची क्षमता आहे. तिवरे धरणाला दुरूस्तीची गरज असल्याचं आधीच लक्षात आलं होतं. या धरणाची दुरूस्ती करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी वारंवार निदर्शनास आणून दिले होते. खासदार विनायक राऊत यांनी पाटबंधारे खात्याला धरण दुरूस्तीच्या सूचनाही केल्या. त्या सूचनांमुळे पाटबंधारे खात्याकडून दोन डंपर माती टाकून दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र चार दिवसांच्या पावसाने ही डागडुजीही कमकुवत ठरवली. आता या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. 
 
धरण फुटल्यानं ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांमध्ये पाणी शिरलं. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यानं 24 जण वाहून गेले. धरण परिसरातील 13 घरंदेखील प्रवाहात वाहून गेली. यामुळे मोठी वित्तहानी झाली. सध्या एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून आतापर्यंत 7 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेला 12 तास उलटल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती