'त्या' वृत्तात कोणतेही तथ्य नाही, मुख्यमंत्री कार्यालयाने केले स्पष्ट

शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (15:59 IST)
राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
 
मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
 
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी येत्या 1 नोव्हेंबरला होणार आहे. अपात्रतेच्या याचिकेसह इतर मुद्द्यांवर ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीनंतर राज्यातील आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणूकांबाबत निर्णय होणार आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती