जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या प्रवेशद्वारालगत मोठ्या दिमाखात उभा करण्यात आलेला 100 फुट ध्वजस्तंभ गेली दोन वर्षे तांत्रिक कारणामुळे उतरवून ठेवण्यात आलेला होता. मात्र स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना महाकाय मागवण्यात आलेल्या क्रेनच्या सहाय्याने या स्तंभाची दुरूस्ती व साफसफाई करण्यात आली. त्यामुळे येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हा ध्वजस्तंभ व तिरंगा पुन्हा डौलाने फडकणार आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगतच हा 100 फुट ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभाच्या ठिकाणी आकर्षक बांधकाम व त्यांच्या सजावटीमुळे हा ध्वजस्तंभ म्हणजे रत्नागिरीकरांची आकर्षण ठरलेले होते. त्याठिकाणी प्रशासनाने सेल्फी पॉईंट विकसित केला आहे.पण काही तांत्रिक कारणामुळे हा ध्वज गेली दोन वर्षे उतरवून ठेवण्यात आला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या ध्वजस्तंभावरील ध्वज फार काळ टिकण्यासमोर अडचण उभी राहिली होती. तसेच या ध्वजस्तंभावरील केबल रोपदेखील तुटला. त्यामुळे नवीन ध्वज येथील स्तंभावर फडकावण्यात अडचणी उभ्या ठाकल्या होत्या.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याचा प्रसार आणि प्रचार जोरात सुरू आहे. त्यामुळे या ध्वजस्तंभावर नव्याने ध्वज फडकण्यासाठी त्याची दुरूस्ती करण्याकडे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यामध्ये लक्ष घातले. हा राष्ट्रध्वज या 15 ऑगस्टला पुन्हा डौलाने फडकण्यासाठी प्रशासानाचा प्रयत्न होता. 100 फुट उंचावर जाणारी मोठी क्रेनची आवश्यकता होती. त्यासाठी प्रशासनाने माहिती घेण्याचे काम हाती घेतले.